घरस्पोर्ट्सपाकिस्तानने केला साहेबांचा गेम!

पाकिस्तानने केला साहेबांचा गेम!

श्रीलंकेने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर धूळ चारत वनडे त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या पाचव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे इंग्लंडचे जेतेपदाचे स्वप्न भंगले असून, आता ३१ ऑक्टोबरला अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे.

पाकिस्तानचा डाव ११० धावांत आटोपला!

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानची श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या २५.३ षटकांत ११० धावांवर गारद झाला. बाबर आझमने सर्वाधिक २९ धावा केल्या, तर हसन नवाझने १७ धावांचे योगदान दिले. अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने भेदक गोलंदाजी करत ३४ धावांत ५ विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सहान अराच्चिगेने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. असिथा फर्नांडो, ईशान मलिंगा आणि दुनिथ वेल्लालगे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

कामिंदू मेंडिसची संयमी खेळी; श्रीलंकेचा सहज विजय

पाकिस्तानने दिलेल्या १११ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने आक्रमक सुरुवात केली. कामिंदू मेंडिस आणि अविष्का फर्नांडो यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. अविष्का १६ धावा करून बाद झाला, तर कर्णधार कुसल मेंडिसला ८ धावांवर माघारी परतावे लागले.

त्यानंतर कामिंदू मेंडिसने पवन रत्नायकेच्या साथीने डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ५२ धावांची भागीदारी करत श्रीलंकेला १८.१ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात विजय मिळवून दिला.

इंग्लंडचे आव्हान संपले!

त्रिकोणीय मालिकेत पाकिस्तानने चारपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. श्रीलंकेने तीनपैकी दोन सामने जिंकत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. इंग्लंडला सुरुवातीचे तिन्ही सामने गमवावे लागल्याने संघ जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

श्रीलंका २९ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात जेतेपदाची लढत होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version