आशियाई क्रीडा स्पर्धा सध्या सुरू असून भारताच्या खात्यात एक पदक आले आहे. नेमबाजीत अखेर भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीने ४८४.६ गुणांची नोंद करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसह त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रमही प्रस्थापित केला.
विशेष म्हणजे, कमलजीत आणि सुरुची ही जोडी सुरुवातीपासून निश्चित नव्हती. स्पर्धेच्या अगदी आधी भारतीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने जोडीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. सुरुचीसोबत सुरुवातीला केदारलिंग बालकृष्ण उचागनवे यांची जोडी निश्चित करण्यात आली होती. मात्र, पुरुषांच्या पात्रता फेरीत कमलजीतने ५८० गुण मिळवत भारतीय नेमबाजांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. तो अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून अवघ्या एका गुणाने दूर राहिला. दुसरीकडे केदारलिंग ५६८ गुणांसह ३५व्या स्थानावर राहिला. त्यानंतर कमलजीतला सुरुचीचा साथीदार करण्यात आले.
जोडी बदलण्याचा हा निर्णय भारतासाठी निर्णायक ठरला. कमलजीत आणि सुरुची यांनी पात्रता फेरीतच आपला दबदबा निर्माण केला. दोघांनी मिळून ५८७ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. या कामगिरीत २९ इनर-१०चा समावेश होता. पहिल्या मालिकेत १९६, दुसऱ्या मालिकेत १९५ आणि तिसऱ्या मालिकेत पुन्हा १९६ गुण मिळवत त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
हे ही वाचा:
“पेजर आठवतात का?” नेतन्याहूंनी पेजर दाखवत हिजबुल्लाहला विचारला प्रश्न
साहिल आत्महत्या प्रकरणात लॉक आयफोन ठरतोय अडथळा
महिलेचा मॉर्फ फोटो वापरल्याप्रकरणी दिपके चौकडीवर गुन्हा
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत व्यापार, तैवान, एआयवर चर्चा
अंतिम फेरीतही भारतीय जोडीने सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली. दक्षिण कोरियाच्या सुह्योन हाँग आणि गॅउन चू यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र कमलजीत-सुरुची यांनी दबाव कायम राखत ४८४.६ गुणांसह सुवर्णपदक निश्चित केले. दक्षिण कोरियाला ४७८ गुणांसह रौप्यपदक, तर इराणला ४१५.८ गुणांसह कांस्यपदक मिळाले. भारतीय जोडीची ही कामगिरी आशियाई विक्रम ठरली. त्यांनी याआधीचा ४८१.३ गुणांचा विक्रम मोडला. त्यांची अंतिम कामगिरी जागतिक विक्रमापेक्षा ३.८ गुणांनी कमी राहिली. या सुवर्णपदकामुळे भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत पहिले सुवर्णपदक मिळाले असून, स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले होते.
