घरक्राईमनामापूर्णेकर हत्याकांडाचे धागेदोरे मीरा रोडपर्यंत

पूर्णेकर हत्याकांडाचे धागेदोरे मीरा रोडपर्यंत

तीन महिलांसह पाच जण गुन्हे शाखेच्या ताब्यात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्याकांडाचे धागेदोरे आता मीरा रोडपर्यंत पोहोचले आहेत. या संवेदनशील प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मीरा रोड परिसरातून तीन महिलांसह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली समतानगर परिसरातून जप्त करण्यात आल्या असून, अटक आरोपी पप्या शिंदे याला न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पूर्णेकर यांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे. जाधव यांनी गुरुवारी घटनास्थळाची पाहणी करून तपासाचा सखोल आढावा घेतला. तपासादरम्यान संशयितांच्या हालचाली मीरा रोड परिसरात आढळून आल्यानंतर पोलिसांनी तीन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या महिला हत्याकांडातील फरार आरोपी संतोष उर्फ टल्ली कनोजिया याच्या सतत संपर्कात होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पाचही जणांची हत्याकांडातील नेमकी भूमिका काय आहे, याचा कसून तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
दिवेआगरच्या समुद्रात पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बोरीवली-राम मंदिरदरम्यान ४ ऑक्टोबरला चार तासांचा जम्बो ब्लॉक

दुसऱ्या ९/११ चे लक्ष्य काय? अब्राहम अकॉर्ड की IMEC

दिपकेंनी केली महात्मा गांधीशी स्वत:ची तुलना

दोन दुचाकी जप्त; संशयित तरुणीचीही चौकशी होणार

एसआयटीने ठाण्यातील समतानगर परिसरातून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यापैकी एक दुचाकी संशयित निखिल उर्फ शूटर यादव याच्या नावावर असून, दुसरी दुचाकी त्याच्या भाच्याच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे, बाळू पूर्णेकर यांचा मुलगा राम याने पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात एका तरुणीचा उल्लेख केला आहे. हत्येच्या घटनेनंतर ही तरुणी पूर्णेकर यांच्या कार्यालयाजवळ संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आली होती. त्यामुळे एसआयटीकडून लवकरच तिचीही चौकशी केली जाणार आहे.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

पूर्णेकर हत्या प्रकरणात निष्पन्न झालेल्या चारही संशयितांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे तपासात समोर आले आहे. अटकेतील पप्या शिंदे याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे आठ ते नऊ गुन्हे दाखल असून, २०१४ मध्ये त्याला तडीपारही करण्यात आले होते. इतर संशयितांच्या गुन्हेगारी नोंदींची माहितीही पोलिसांकडून गोळा केली जात आहे.

दरम्यान, फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून, महाराष्ट्रासह परराज्यांतही त्यांचा कसून शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version