घरस्पोर्ट्ससॅमसन नाही… बुमराहच खरा हिरो!

सॅमसन नाही… बुमराहच खरा हिरो!

भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला तब्बल ९६ धावांनी पराभूत करत टीम इंडियाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत दमदार फलंदाजी करणाऱ्या भारतीय विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार देण्यात आला. मात्र या निवडीबाबत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स यांचे मत थोडे वेगळे आहे.

डिव्हिलियर्स यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, प्लेयर ऑफ द टूर्नामेंटसाठी संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांच्यात खूपच जवळची स्पर्धा होती.

ते म्हणाले, “स्पर्धेदरम्यान काही असे क्षण होते, जेव्हा बुमराहची गोलंदाजी पाहून मला वाटले की त्यालाच हा पुरस्कार मिळायला हवा होता.”

डिव्हिलियर्स पुढे म्हणाले की, बुमराहने या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे तो या पुरस्काराचा मजबूत दावेदार होता. निर्णायक क्षणी त्याने टाकलेले काही ओव्हर आणि त्याचे प्रभावी स्पेल भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.

“भारतामध्ये वेगवान गोलंदाज म्हणून गोलंदाजी करणे सोपे नाही… जोपर्यंत तुम्ही बुमराह नसता. तो गरजेच्या क्षणी वेगळ्याच गिअरमध्ये जातो आणि सामना बदलून टाकतो. तो संघासाठी एक मोठी संपत्ती आहे,” असेही डिव्हिलियर्स यांनी सांगितले.

टी-२० विश्वचषकात जसप्रीत बुमराहने ८ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या. तो वरुण चक्रवर्तीसोबत संयुक्तरीत्या सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. मात्र वरुणने बुमराहपेक्षा एक सामना जास्त खेळला होता. याशिवाय बुमराहची इकॉनॉमी रेटही अत्यंत प्रभावी होती. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांत त्याने शानदार गोलंदाजी केली.

दरम्यान, संजू सॅमसननेही आपल्या फलंदाजीने स्पर्धेत मोठी छाप पाडली. त्याने फक्त पाच सामने खेळत जवळपास २०० च्या स्ट्राइक रेटने ३२१ धावा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत नाबाद ९७, इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत ८९ आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांची शानदार खेळी करत त्याने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

याच प्रभावी कामगिरीमुळे संजू सॅमसनला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version