मेस्सीची गोलमालिका खंडित, पण अर्जेंटिना उपांत्य फेरीत

स्वित्झर्लंडवर ३-१ असा विजय, आता इंग्लंडशी सामना

मेस्सीची गोलमालिका खंडित, पण अर्जेंटिना उपांत्य फेरीत

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये गतविजेत्या अर्जेंटिनाने पुन्हा एकदा आपली विजयी परंपरा कायम राखत स्वित्झर्लंडचा अतिरिक्त वेळेत ३-१ असा पराभव केला आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. कॅन्सस सिटी येथे झालेल्या या अत्यंत चुरशीच्या उपांत्यपूर्व सामन्यात नियमित वेळ संपल्यानंतर दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते. मात्र अतिरिक्त वेळेत ज्युलियन अल्वारेझ आणि लाऊतारो मार्टिनेझ यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर अर्जेंटिनाने विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह लिओनेल मेस्सीचा संघ आता उपांत्य फेरीत इंग्लंडशी दोन हात करणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटिनाने आक्रमक खेळ दाखवला. पहिल्याच हाफमध्ये लिओनेल मेस्सीच्या अचूक कॉर्नरवर अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टरने शानदार हेडरद्वारे गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. मात्र स्वित्झर्लंडने हार मानली नाही. दुसऱ्या हाफमध्ये डॅन एनडोयेने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला आणि अर्जेंटिनाच्या बचावफळीला मोठे आव्हान दिले.

सामन्यातील निर्णायक क्षण ७२व्या मिनिटाला आला. स्वित्झर्लंडचा ब्रिल एम्बोलो याला व्हीएआर तपासणीनंतर रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे उर्वरित सामना स्वित्झर्लंडला दहा खेळाडूंवर खेळावा लागला. अतिरिक्त खेळाडूचा फायदा घेत अर्जेंटिनाने अखेर अतिरिक्त वेळेत निर्णायक मुसंडी मारली. ११२व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने दूरवरून अप्रतिम गोल झळकावत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरच्या क्षणांत लाऊतारो मार्टिनेझने तिसरा गोल करत अर्जेंटिनाचा विजय निश्चित केला.

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सीने गेल्या ९ विश्वचषक फुटबॉल सामन्यात गोल केले. मात्र स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याची ही मालिका खंडित झाली. या सामन्यात त्याला एकही गोल करता आला नाही. मात्र त्याने दिलेल्या अचूक कॉर्नरवर अर्जेंटिनाच्या खात्यात एक गोल मात्र जमा झाला.

या विजयामुळे अर्जेंटिनाचे सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न कायम आहे. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत आता त्यांच्यासमोर इंग्लंडचे कडवे आव्हान असेल. इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा पराभव करून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे दोन पारंपरिक फुटबॉल महासत्तांमधील हा सामना विश्वचषकातील सर्वात मोठ्या लढतींपैकी एक ठरणार आहे.

अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना १५ जुलै रोजी अमेरिकेतील अटलांटा येथील मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

Exit mobile version