ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या २०१८ मधील सँडपेपरगेट प्रकरणावर फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट याने अखेर मौन सोडले आहे. या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी उघड केल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने मोकळे आणि आनंदी झाल्याची भावना त्याने व्यक्त केली.
२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सँडपेपरचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर बॅनक्रॉफ्टसह तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती.
बॅनक्रॉफ्टने ‘वेस्ट ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्रात सुमारे चार हजार शब्दांचा लेख लिहून या प्रकरणाबाबत धक्कादायक दावे केले आहेत. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सँडपेपरच्या वापराबाबत संपूर्ण संघाला माहिती होती, असा दावा त्याने केला. तसेच या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आपण संपूर्ण आणि खरी माहिती दिली नव्हती, असेही त्याने मान्य केले.
या खुलाशानंतर बोलताना बॅनक्रॉफ्ट म्हणाला, “कालचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक होता. मी बराच काळ हे सर्व मनात दडवून ठेवले होते. आता खऱ्या अर्थाने मोकळे झाल्यासारखे वाटत आहे. हे सर्व सांगता आल्याचा मला खूप आनंद आहे.”
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणासंदर्भात स्वतंत्र व्यासपीठ सुरू केले असून, त्यात सहभागी होण्याची तयारी बॅनक्रॉफ्टने दर्शवली आहे. या प्रक्रियेचा भाग होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कर्णधार पॅट कमिन्स याने या दौऱ्यात चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रयत्नांची आपल्याला माहिती नव्हती, अशी भूमिका कायम ठेवली आहे. त्याचा एजंट नील मॅक्सवेल यानेही कमिन्सची भूमिका स्पष्ट केली. गेल्या आठ वर्षांपासून कमिन्सच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नसून तो आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचे त्याने सांगितले. बॅनक्रॉफ्टला या प्रकरणामुळे मोठा त्रास सहन करावा लागल्याची खंतही कमिन्सला असल्याचे त्याने नमूद केले.
