२०१८ मधील बहुचर्चित बॉल टॅम्परिंग प्रकरणावरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने उस्मान ख्वाजाच्या वक्तव्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीच्या पद्धतीवर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपासाच्या विश्वासार्हतेवरही वॉर्नरने प्रश्न उपस्थित केले आहेत.
वॉर्नरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत ख्वाजाच्या भूमिकेचे समर्थन केले. काही जखमा काळानुसारही भरून निघत नाहीत. सत्य बोलण्यासाठी धैर्य लागते, विशेषतः जेव्हा लोक तुम्हाला गप्प राहण्यास सांगत असतात. काळ लोटला म्हणून जबाबदारी संपत नाही आणि प्रश्न विचारणे म्हणजे कोणाशी मतभेद असणे नव्हे, असे वॉर्नरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणावर आठ वर्षांनंतर बोलण्याच्या ख्वाजाच्या निर्णयाचेही वॉर्नरने समर्थन केले. ख्वाजाने जे काही सांगितले आहे, ते ऐकले पाहिजे. आठ वर्षांनंतरच का बोलला, पुस्तक विकण्यासाठी हे केले का, असे प्रश्न उपस्थित करण्याऐवजी त्याच्या वक्तव्याची सत्यता तपासली पाहिजे, असे वॉर्नर म्हणाला. ख्वाजाने त्या दिवसापासून घडलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली असल्याचेही त्याने नमूद केले.
या प्रकरणाच्या चौकशी प्रक्रियेवरही वॉर्नरने गंभीर आक्षेप घेतले. कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या शेजारी उस्मान ख्वाजा बसलेला असतानाही त्याची अधिकृत चौकशी करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही चौकशी नेमकी कशी पूर्ण झाली, असा प्रश्न वॉर्नरने उपस्थित केला. चौकशीची प्रक्रिया घाईघाईत आणि गोंधळात पार पडल्याचे सांगत, आता व्यक्तींना दोष देण्याऐवजी तपासासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेकडून पारदर्शकतेची मागणी करण्याची वेळ आली असल्याचे त्याने स्पष्ट केले.
या जुन्या प्रकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाल्यामुळे आपल्या कुटुंबालाही भावनिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे वॉर्नरने सांगितले. विशेषतः त्याची १२ वर्षांची मुलगी आयव्ही या प्रकरणाबाबत प्रश्न विचारत होती. त्या वेळी इतके कॅमेरे का होते, आम्ही दूरचित्रवाणीवर का रडत होतो, असे प्रश्न तिने विचारल्याचे वॉर्नरने सांगितले. मुलींना सत्य बोलण्याचा सल्ला दिला असून खोटे कधी ना कधी उघड होतेच, असेही त्याने नमूद केले.
२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार घडला होता. या प्रकरणात तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांची नावे समोर आली होती. चेंडूची स्थिती बदलण्यासाठी सँडपेपरचा वापर केल्याचे उघड झाल्यानंतर क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणानंतर वॉर्नर, स्मिथ आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर दीर्घकाळासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता आठ वर्षांनंतर उस्मान ख्वाजाने या घटनेची माहिती संपूर्ण संघाला होती, असा दावा केल्याने जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. ख्वाजाच्या या वक्तव्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील त्या काळातील घडामोडी आणि चौकशीच्या पारदर्शकतेबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
