घरस्पोर्ट्सपड्डिकलची शतकी खेळी; पहिल्याच दिवशी भारताचा दबदबा

पड्डिकलची शतकी खेळी; पहिल्याच दिवशी भारताचा दबदबा

गालेच्या मैदानावर पावसाने वारंवार खेळ थांबवला, पण भारतीय फलंदाजांनी मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताने ७३ षटकांत २ बाद २८८ धावा करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. यशस्वी जायस्वाल आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात करत ११ षटकांत ४७ धावा जोडल्या. मात्र ३२ धावांवर जायस्वाल धावबाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला.

यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १५० धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना अक्षरशः निष्प्रभ केले. राहुलने १६२ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि एका षटकारासह ७७ धावांची संयमी खेळी केली.

मात्र तिसऱ्या सत्रात राहुलला अचानक स्नायूंमध्ये गोळे आल्याने मैदान सोडावे लागले. पायात तीव्र वेदना होत असल्याने तो ७७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. ड्रेसिंग रूमकडे जातानाही राहुलला चालताना त्रास होत होता. भारतीय फिजिओ कमलेश जैन यांच्या मदतीने तो ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला.

राहुलच्या जागी कर्णधार शुभमन गिल फलंदाजीला आला. गिलने पडिक्कलसोबत ३९ धावांची भर घातली; मात्र १६ धावांवर तो प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था २ बाद २३६ अशी झाली.

यानंतर पावसामुळे काही काळ सामना थांबला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर मात्र देवदत्त पडिक्कलने आपला गियर बदलला. त्याने ऋषभ पंतसोबत नाबाद अर्धशतकी भागीदारी करत भारताला दिवसअखेरीस मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

पडिक्कलने १७८ चेंडूंत नाबाद १३१ धावा ठोकत आपले शतक दणक्यात साजरे केले. त्याच्या खेळीत १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला ऋषभ पंतनेही आक्रमक अंदाज कायम ठेवत ३६ चेंडूंमध्ये नाबाद २७ धावा केल्या आहेत.

श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याला एकमेव यश मिळाले. २४ षटकांत ७७ धावा देत त्याने एक विकेट घेतली.

पहिला दिवस संपताना चित्र स्पष्ट आहे—पावसाने वेळ खाल्ला, राहुलने मैदान सोडलं; पण पडिक्कलने श्रीलंकेच्या गोलंदाजांची परीक्षा घेत भारताला मजबूत स्थितीत नेलं. आता दुसऱ्या दिवशी भारताची धावसंख्या किती पुढे जाते आणि राहुल पुन्हा फलंदाजीला उतरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version