घरस्पोर्ट्सईशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोनने १३ वर्षांने जिंकली दुलीप ट्रॉफी

ईशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोनने १३ वर्षांने जिंकली दुलीप ट्रॉफी

ईशान किशनच्या नेतृत्वाखाली ईस्ट झोनने तब्बल १३ वर्षांचा दुष्काळ संपवत दुलीप ट्रॉफीवर नाव कोरले. एम.ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर साउथ झोनविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ईस्ट झोनला विजेता घोषित करण्यात आले.

ईस्ट झोनने तिसऱ्यांदा दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी संघाने २०१२-१३ मध्ये अखेरची ट्रॉफी जिंकली होती.

अंतिम सामन्यात ईस्ट झोनने पहिल्या डावात धावांचा अक्षरशः पाऊस पाडत ७०८ धावा केल्या. कर्णधार ईशान किशनने ३३४ चेंडूंत २७० धावांची विक्रमी खेळी केली. त्याने या खेळीत ३० चौकार आणि ७ षटकार ठोकले.

कुमार कुशाग्रने १३२ चेंडूंत १०१ धावांचे शतक झळकावले. शिखर मोहनने ८५, अभिमन्यू ईश्वरनने ७२, अनुकूल रॉयने ४५, वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३७ चेंडूंत ४४ आणि मोहम्मद कौनेन कुरैशीने ४० धावा केल्या.

ईस्ट झोनच्या ७०८ धावांना प्रत्युत्तर देताना साउथ झोनचा पहिला डाव ३३६ धावांत आटोपला. कर्णधार तिलक वर्माने ९९ धावा केल्या, तर देवदत्त पडिक्कलने ६२ आणि चमा मिलिंदने ४३ धावा केल्या.

ईस्ट झोनकडून गोलंदाजीत मुकेश कुमारने ३ बळी, तर मोहम्मद शमी, कुरैशी आणि शिखर मोहन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. त्यामुळे ईस्ट झोनला पहिल्या डावात तब्बल ३७२ धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावातही ईस्ट झोनची फलंदाजी दमदार राहिली. सामना अनिर्णित घोषित होण्यापूर्वी संघाने ७ बाद ३८८ धावा केल्या. ईशान किशनने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करत ८० धावा केल्या. मोहम्मद कौनेन कुरैशीने १९० चेंडूंत नाबाद ११६ धावा ठोकल्या. अनुकूल रॉयने ६४, तर शिखर मोहनने अर्धशतकी खेळी केली.

पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या जोरावर ईस्ट झोनने १३ वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version