घरस्पोर्ट्सझिम्बाब्वेविरुद्ध स्मृतीची विक्रमी खेळी होणार?

झिम्बाब्वेविरुद्ध स्मृतीची विक्रमी खेळी होणार?

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत मानधनाने आणखी १३३ धावा केल्यास तिच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण होईल. अशी कामगिरी करणारी ती महिला आणि पुरुष क्रिकेटमधील पहिली फलंदाज ठरू शकते.

रायपूर येथे होणाऱ्या या मालिकेतून मानधना भारतीय महिला संघाची पूर्णवेळ कर्णधार म्हणून आपल्या नव्या भूमिकेची सुरुवात करणार आहे. सध्या ती चांगल्या फॉर्ममध्ये असून, सलामीवीर म्हणून तिला विक्रम प्रस्थापित करण्याची उत्तम संधी आहे.

मानधनाने २०१३ पासून आतापर्यंत १७९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. त्यातील १७२ डावांत तिने दोन शतके आणि ३७ अर्धशतकांसह ४,८६७ धावा केल्या आहेत. या प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला फलंदाजांच्या यादीत ती अव्वल स्थानावर आहे.

न्यूझीलंडची सूझी बेट्स ४,७५८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने १८६ सामन्यांच्या १७८ डावांत एक शतक आणि २८ अर्धशतके झळकावली आहेत. भारताची हरमनप्रीत कौर ४,३४६ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तिने २१० सामन्यांच्या १८८ डावांत एक शतक आणि १८ अर्धशतके नोंदवली आहेत.

पुरुषांच्या विक्रमालाही मानधना देणार आव्हान

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पुरुषांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम ४,५९६ धावांसह अव्वल आहे. त्याने १४५ सामन्यांच्या १३६ डावांत तीन शतके आणि ३९ अर्धशतके केली आहेत. इंग्लंडचा जोस बटलर ४,३८४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे ४,२३१ आणि ४,१८८ धावांसह या यादीत पुढील स्थानांवर आहेत. दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत स्मृती मानधना १३३ धावांचा टप्पा गाठते का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. तिच्या बॅटमधून ऐतिहासिक खेळी साकारल्यास भारतीय महिला क्रिकेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version