घरस्पोर्ट्सपिकलबॉलमध्ये भारताची पदकांची लयलूट

पिकलबॉलमध्ये भारताची पदकांची लयलूट

व्हिएतनाममधील दा नांग येथे झालेल्या पिकलबॉल वर्ल्ड कपमध्ये भारताने दमदार कामगिरी करत चौथे स्थान पटकावले. भारतीय संघाने स्पर्धेत तब्बल ४१ पदकांची कमाई केली. यात ७ सुवर्ण, १७ रौप्य आणि १७ कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी भारत सातव्या स्थानावर राहिला होता.

भारताच्या ४८ खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करत किड्स, ज्युनियर्स, ओपन, सीनियर्स आणि मास्टर्स अशा विविध सांघिक गटांमध्ये सहभाग घेतला. याशिवाय १३० हून अधिक भारतीय खेळाडूंनी वैयक्तिक गटांमध्येही आपले कौशल्य दाखवले.

वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची सर्वात उल्लेखनीय कामगिरी किड्स संघाने जिंकलेल्या रौप्यपदकाची ठरली. वीर शाहच्या नेतृत्वाखालील या संघात विरांष चोपडा, आरिन बल्लानी, महिका राठौड, मानसी कार्तिक, आश्रिता एस., कवीर मेहता आणि प्रार्थना मोटियानी यांचा समावेश होता. वीर शाहला किड्स गटातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा पुरस्कारही मिळाला.

भारतीय ज्युनियर संघाला उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य व्हिएतनामकडून पराभव पत्करावा लागला आणि संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अर्जुन सिंहने संघाचे नेतृत्व केले. आदित्य सिंह, देव शाह, पूर्वांश पटेल, विवान पटेल, नाओमी अमलसादीवाला, आश्रिता राजू आणि दिया मट्टीपती हे संघातील इतर खेळाडू होते.

भारतीय ओपन संघाला उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेकडून २-४ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे अंतिम सामन्याच्या एक दिवस आधीच भारताचे आव्हान संपुष्टात आले. हर्ष मेहता हा ओपन संघाचा कर्णधार होता. त्याच्यासोबत अर्जुन सिंह, अनीश फ्रोलियन, अमन पटेल, नाओमी अमलसादीवाला, पर्ल अमलसादीवाला, मिहिका यादव आणि आलिया इब्राहिम यांचा संघात समावेश होता.

मास्टर्स संघालाही उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामकडून पराभव पत्करावा लागला. तर भारतीय सीनियर संघाला न्यूझीलंडकडून पराभव झाल्याने ‘राउंड ऑफ १६’मध्येच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

वैयक्तिक गटांमध्येही भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. हर्ष मेहताने ओपन प्रो पुरुष दुहेरीत कांस्यपदक पटकावले. पूर्वांश पटेलने १८ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत सुवर्णपदक जिंकले.

भूषण अकुतने अशोक रोहिरासोबत ६० वर्षांवरील पुरुष दुहेरी, तसेच ६० वर्षांवरील पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली. फेरोज जैदीने ४० वर्षांवरील महिला एकेरीत, तर विवेक रेड्डीने ४० वर्षांवरील पुरुष एकेरीत विजेतेपद मिळवले.

एकूणच, गेल्या वर्षीच्या सातव्या स्थानावरून यंदा चौथ्या स्थानावर झेप घेत भारताने पिकलबॉलमधील आपली वाढती ताकद दाखवून दिली. ७ सुवर्ण, १७ रौप्य आणि १७ कांस्य अशा एकूण ४१ पदकांसह भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा उंचावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version