घरस्पोर्ट्सविश्वचषकाचे स्वप्न पुन्हा अधुरे; टीम इंडिया कुठे कमी पडली?

विश्वचषकाचे स्वप्न पुन्हा अधुरे; टीम इंडिया कुठे कमी पडली?

महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय महिला संघाचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर भारताचे आव्हान संपुष्टात आले. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाकडून टी-२० विश्वचषक जिंकण्याची मोठी अपेक्षा होती. मात्र, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील उणिवा भारताला महागात पडल्या.

भारतीय संघाला स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी अनेक सामन्यांत दमदार सुरुवात करून दिली. मात्र, मधल्या फळीतील संथ फलंदाजीमुळे संघाचा धावगतीवर परिणाम झाला. विशेषतः जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांना निर्णायक क्षणी अपेक्षित वेगाने धावा करता आल्या नाहीत.

क्षेत्ररक्षणातही भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. महत्त्वाच्या क्षणी झेल सुटले, तर खराब क्षेत्ररक्षणामुळे प्रतिस्पर्ध्यांना अतिरिक्त धावा मिळाल्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर सातत्याने दबाव वाढत गेला.

इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजीस पोषक वातावरण असूनही भारतीय पेस आक्रमण प्रभावी ठरले नाही. रेणुका सिंहसह इतर वेगवान गोलंदाजांना विकेट मिळवण्यात अपयश आले. श्री चरणीने फिरकीत चांगली कामगिरी केली, मात्र तिला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ फिरकी गोलंदाजांवरच अधिक अवलंबून राहिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धही बहुतांश षटके फिरकीपटूंनी टाकली. वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थितीतही ही रणनीती भारताच्या अडचणीचे कारण ठरली.

कर्णधार हरमनप्रीत कौरलाही या स्पर्धेत फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्ही आघाड्यांवर अपेक्षित छाप पाडता आली नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध तिचे नेतृत्व प्रभावी ठरले नाही, तर फलंदाजीतही सातत्याचा अभाव दिसून आला.

या सर्व कारणांमुळे भारतीय महिला संघाचे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आणखी एकदा अपूर्णच राहिले. आता पुढील मोठ्या स्पर्धेपूर्वी या उणिवांवर काम करण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनासमोर असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version