भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील निर्णायक दुसरा कसोटी सामना हेग्ली ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत भारताच्या पहिल्या डावातील सहा फलंदाजांना अवघ्या ११६ धावांवर माघारी धाडले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे.
पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वालला खातेही उघडता आले नाही. मॅट हेन्रीच्या अप्रतिम चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. पडिक्कलने २० चेंडूंमध्ये २१ धावा केल्या.
कर्णधार शुभमन गिललाही फलंदाजीमध्ये विशेष चमक दाखवता आली नाही. तो १७ धावा करून बाद झाला. केएल राहुलने ८० चेंडूंचा सामना करत २५ धावा केल्या. त्याला जेकब डफीने बाद केले. ऋषभ पंतने चांगली सुरुवात केली, मात्र त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पंत ३९ चेंडूंमध्ये २३ धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर दिवसातील शेवटच्या चेंडूवर १० धावा करून माघारी परतला. ध्रुव जुरेल ७ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे.
हे ही वाचा:
खर्गे म्हणतात, अनुसूचित जाती-जमातींच्या विरोधात पुनर्रचना विधेयक
२,३६० कोटींच्या कपड्यांच्या ऑर्डर्स भारताकडे वळल्या
अफगाणिस्तानमध्ये शाळेत भीषण स्फोट
पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसणारा!
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ न्यूझीलंडच्या धावसंख्येपेक्षा अद्याप २४० धावांनी पिछाडीवर होता. भारताच्या हातात केवळ चार विकेट शिल्लक आहेत. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना जेकब डफीने शानदार कामगिरी केली. त्याने ८ षटकांत २१ धावा देत २ विकेट मिळवल्या. काइल जेमिसनने ३३ धावा खर्च करून २ फलंदाजांना बाद केले. मॅट हेन्री आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
यापूर्वी न्यूझीलंडचा पहिला डाव ३५६ धावांवर आटोपला होता. संघाकडून टॉम ब्लंडेलने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत १० चौकार लगावले. कर्णधार टॉम लॅथमनेही ५९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय ग्लेन फिलिप्सने ३६, तर डेव्हॉन कॉनवेने ३१ धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजी करताना आकाश दीप सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने ९९ धावा देत पाच विकेट मिळवल्या. तर अंशुल कंबोज आणि गुरनूर बरार यांनी न्यूझीलंडच्या प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.
