घरस्पोर्ट्सभारताच्या लेकींचा एशियन गेम्समध्ये सुवर्णधडाका!

भारताच्या लेकींचा एशियन गेम्समध्ये सुवर्णधडाका!

भारतीय महिला क्रिकेट संघाने एशियन गेम्स २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल १४७ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा एशियन गेम्सचे सुवर्णपदक जिंकले. एशियन गेम्स २०२६ मधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले.

स्मृती, शेफाली आणि ऋचाचा धडाका; भारताची २१६ धावांची मजल

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी आक्रमक सुरुवात करत पहिल्या गड्यासाठी अवघ्या १० षटकांत ९९ धावांची भागीदारी रचली.

शेफाली वर्माने २९ चेंडूंत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४८ धावांची खेळी केली. त्यानंतर स्मृती मंधानाने आपला आक्रमक फॉर्म कायम ठेवत ४५ चेंडूंत ७ षटकार आणि ५ चौकारांसह ७९ धावांची शानदार खेळी साकारली. तिने हरमनप्रीत कौरसोबत दुसऱ्या गड्यासाठी ४२ धावा जोडल्या. हरमनप्रीतने १९ धावा केल्या.

अखेरच्या षटकांमध्ये यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोषने तुफानी फलंदाजी करत नाबाद ४९ धावा फटकावल्या. ऋचाने २२ चेंडूंत ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. तिच्या या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ३ गडी गमावून २१६ धावांचा डोंगर उभारला. भारती फूलमाली ७ धावांवर नाबाद राहिली.

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव ६९ धावांत गडगडला

भारताने दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांची अक्षरशः तारांबळ उडाली. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेचा डाव अवघ्या १५.४ षटकांत ६९ धावांवर गुंडाळला.

श्रीलंकेच्या कर्णधार चमारी अटापट्टूने सर्वाधिक २९ धावा केल्या. यष्टिरक्षक कौशिनी नुथ्यांगनाने १४, तर कविशा दिल्हारीने ११ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

भारताकडून दीप्ती शर्माने ३ बळी घेतले. शेफाली वर्मा, श्रेयंका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी २ बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीची वाताहत केली.

सुवर्णपदक भारताचे; श्रीलंकेला रौप्य

फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत वर्चस्व गाजवत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. १४७ धावांच्या मोठ्या फरकाने श्रीलंकेवर मात करत भारताने सलग दुसऱ्यांदा एशियन गेम्सचे सुवर्णपदक पटकावले. श्रीलंकेला रौप्यपदक मिळणार आहे.

यापूर्वी झालेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version