घरस्पोर्ट्सश्रेयस झाला कॅप्टन, वैभवला टीम इंडियाचे दरवाजे उघडले!

श्रेयस झाला कॅप्टन, वैभवला टीम इंडियाचे दरवाजे उघडले!

- Advertisement -

भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवत बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकांसह एशियन गेम्स २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या निवडीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे श्रेयस अय्यरची टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती आणि अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला मिळालेली संधी!

आयपीएल २०२६ मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. आयर्लंड, इंग्लंड मालिका आणि एशियन गेम्स अशा तिन्ही स्पर्धांसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटला आणखी एक युवा तारा मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

यावेळी तिलक वर्मा यांच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर हर्षित राणा आणि रवि बिश्नोई यांनी संघात पुनरागमन केले आहे. युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव यालाही आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेसाठी संधी मिळाली आहे. मात्र एशियन गेम्ससाठी त्याची निवड झालेली नाही.

विशेष म्हणजे भारताला टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून देणारे सूर्यकुमार यादव यांना या तिन्ही संघांमध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे या निर्णयाचीही क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सलामीपासून गोलंदाजीपर्यंत दमदार संघ

आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेसाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्याकडे सलामीची जबाबदारी असेल. याशिवाय ईशान किशन, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारखे अष्टपैलू खेळाडू संघाला बळ देतील.

फिरकी विभागात वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. तर वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज सांभाळणार असून त्याला अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि प्रिन्स यादव यांची साथ मिळणार आहे.

एशियन गेम्ससाठी बुमराहची एन्ट्री

एशियन गेम्ससाठी निवडलेल्या संघात एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र मोहम्मद सिराज यांना या संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे एशियन गेम्समध्ये भारताची गोलंदाजी आणखी भेदक होण्याची शक्यता आहे.

भारताला आयर्लंडविरुद्ध २ सामन्यांची टी-२० मालिका, तर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेसाठी भारतीय टी-२० संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, वैभव सूर्यवंशी, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि प्रिन्स यादव.

एशियन गेम्स २०२६ साठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि वैभव सूर्यवंशी.

१५ वर्षांच्या वैभवला संधी, श्रेयसकडे कर्णधारपद आणि सूर्यकुमार यादव बाहेर… भारतीय टी-२० क्रिकेटच्या नव्या पर्वाची ही जोरदार सुरुवात मानली जात आहे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version