घरस्पोर्ट्सक्लिप वारंवार पाहिली, दिशा बदलली नाही

क्लिप वारंवार पाहिली, दिशा बदलली नाही

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाज अंगकृष रघुवंशीला ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’मुळे दिलेल्या आऊट निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले.

ललित मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “रविवारी झालेल्या सामन्यात अंपायरचा निर्णय योग्य वाटला नाही. क्लिप अनेक वेळा पाहिली, पण फलंदाजाने धावताना दिशा बदलली असे दिसले नाही. या प्रकरणाची तपास समितीने पाहणी करावी.”

केकेआरच्या डावातील पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अंगकृषने मिड-ऑनच्या दिशेने फटका मारून धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या टोकावर असलेल्या कॅमेरून ग्रीनने त्याला परत पाठवले. अंगकृष क्रीजमध्ये परतताना डायव्ह करत असताना फिल्डरचा थ्रो त्याच्या पायाला लागला. यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या खेळाडूंनी अपील केले आणि तिसऱ्या अंपायरच्या मदतीने त्याला ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’मुळे आऊट घोषित करण्यात आले.

या निर्णयानंतर अंगकृष नाराज दिसला. पॅव्हेलियनकडे परतताना त्याने बाउंड्रीजवळ बॅट आपटली तसेच हेल्मेटही फेकले. केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनीही अंपायरांशी चर्चा करत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आयपीएल २०२६ मधील ३८व्या सामन्यात केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना टाय झाला. केकेआरने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद १५५ धावा केल्या. रिंकू सिंहने ८३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात लखनऊनेही २० षटकांत ८ बाद १५५ धावा करत सामना बरोबरीत आणला.

सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनने प्रभावी गोलंदाजी करत तीन चेंडूंमध्ये दोन विकेट घेत लखनऊला केवळ १ धावेवर रोखले. त्यानंतर रिंकू सिंहने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत केकेआरला विजय मिळवून दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version