घरस्पोर्ट्सपाऊस बरसला, विराट तळपला; भारताची विजयी सलामी!

पाऊस बरसला, विराट तळपला; भारताची विजयी सलामी!

विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीला अर्शदीप सिंहच्या भेदक गोलंदाजीची साथ मिळाल्याने भारताने पहिल्याच वनडेत न्यूझीलंडला पाच विकेट्सनी धूळ चारली. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार बदललेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २२.४ षटकांत विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा डाव भारतीय गोलंदाजांनी ४०.२ षटकांत अवघ्या १८५ धावांत गुंडाळला. टिम सिफर्टने ३८, ब्लेअर टिकनरने ३४, ग्लेन फिलिप्सने ३०, तर डॅरिल मिचेलने २८ धावा केल्या. अर्शदीप सिंहने चार विकेट्स घेत किवी फलंदाजीचे कंबरडे मोडले. गुरनूर बरारने तीन, तर अंशुल कंबोजने दोन विकेट्स मिळवल्या. कंबोजने दहा षटकांत अवघ्या २२ धावा देत केलेली अचूक गोलंदाजी विशेष लक्षवेधी ठरली.

१८६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकांत रोहित शर्माच्या रूपाने धक्का बसला. रोहितला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी डावाची सूत्रे हाती घेत दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची दमदार भागीदारी केली. गिलने ५६ चेंडूंत ३७ धावा केल्या. मात्र, सामन्यात पावसाने दोनदा व्यत्यय आणल्याने खेळाचे समीकरण बदलले. डीएलएस नियमानुसार भारतासमोर ३२ षटकांत १४३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.

विराट कोहलीने आपल्या अनुभवाचा आणि आक्रमकतेचा प्रत्यय देत अवघ्या ५१ चेंडूंत ७४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र, गिल आणि विराट बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी काहीशी अडखळली. अक्षर पटेलला भोपळाही फोडता आला नाही, तर श्रेयस अय्यरने १५ धावा केल्या.

अखेर राहुल आणि नमन धीर यांनी संयम राखत भारताला विजय मिळवून दिला. भारताने २२.४ षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात १४३ धावा पूर्ण केल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफीने तीन, तर काइल जेमिसन आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version