दिवाळी आणि छठपूजेच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३६ विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात नियमित गाड्यांवरील प्रवाशांचा ताण कमी करणे आणि प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस, लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर या मार्गांवरील विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय खडकी-सांगानेर, हडपसर-गाझीपूर सिटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नॉर्थ या मार्गांवरील विशेष गाड्यांचाही यात समावेश आहे.
हे ही वाचा:
केरळ, पंजाब आणि तामिळनाडूत ईडीची छापेमारी
विराटच्या १३ टॅटूंमागे दडलंय तरी काय?
बालमजुरी रोखण्यासाठी विशेष देखरेख कक्ष स्थापन करा
कॅन्व्हामध्ये २२ टक्के कर्मचाऱ्यांची कपात
या निर्णयानुसार काही साप्ताहिक आणि द्विसाप्ताहिक गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तर लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर आणि दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस या दैनिक विशेष गाड्या अनुक्रमे २२ ते २९ नोव्हेंबर आणि २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान धावणार आहेत. विशेष म्हणजे या गाड्यांच्या सध्याच्या मार्गात, वेळापत्रकात, डब्यांच्या रचनेत, थांब्यांमध्ये आणि भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
या विशेष गाड्यांमधील निवडक आठ गाड्यांचे आरक्षण ५ नोव्हेंबर २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे सामान्य भाडेदराने उपलब्ध असतील. प्रवाशांना रेलवन ॲपवरूनही तिकिटे बुक करता येतील. गाड्यांचे वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती मिळवण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा एनटीईएस ॲपला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी केले आहे.
