घरस्पोर्ट्स'विराटची साथ अन् सुवर्णाची वाट!'

‘विराटची साथ अन् सुवर्णाची वाट!’

साक्षी चौधरीचे वक्तव्य

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी महिला मुष्टियोद्धा साक्षी चौधरी हिने आपल्या यशामागील प्रेरणास्थान आणि पाठीराख्यांचा उल्लेख करताना ऑलिम्पिक पदकविजेता विजेंदर सिंग आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांचे विशेष आभार मानले. विजेंदरला पाहूनच आपण मुष्टियुद्ध सुरू केले, तर विराट कोहलीने प्रायोजक म्हणून मोठा आधार दिल्याचे तिने सांगितले.

हरियाणातील भिवानी येथे घरी परतल्यानंतर साक्षीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना तिने ५१ किलो वजनी गटातील सुवर्णपदक देशवासीयांना समर्पित करत असल्याचे सांगितले.

साक्षी म्हणाली, “कॉमनवेल्थ गेम्ससाठी रवाना होण्यापूर्वी मी आई-वडिलांना सुवर्णपदक जिंकून परत येण्याचे वचन दिले होते. ते वचन पूर्ण करता आले, याचा मला सर्वाधिक आनंद आहे.”

ग्लासगोमध्ये पदक वितरणावेळी भारतीय तिरंगा फडकताना राष्ट्रगीत वाजण्याचा क्षण आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद असल्याचेही तिने नमूद केले. “परदेशात आपल्या यशामुळे भारताचे राष्ट्रगीत ऐकणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. देशासाठी सुवर्णपदक जिंकण्यापेक्षा मोठा अभिमान दुसरा नाही,” असे ती म्हणाली.

दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताने १३ सुवर्णांसह एकूण ३९ पदके जिंकली. त्यापैकी १० पदके भारतीय मुष्टियोद्ध्यांनी मिळवली असून, कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारतीय बॉक्सिंग संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version