मायदेशात २०२५ मध्ये झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. या ऐतिहासिक विजयामुळे महिला क्रिकेटला समाजात अधिक सन्मान मिळू लागला असून, देशातील प्रत्येक घराघरात महिला क्रिकेटपटूंची ओळख निर्माण झाली आहे, असे मत भारतीय कर्णधार स्मृती मानधना हिने व्यक्त केले.
स्मृतीने ‘जिओस्टार’शी बोलताना सांगितले की, विश्वचषक विजयामुळे गेल्या वर्षभरात महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. महिला क्रिकेटला मिळणारा सन्मान आणि प्रेक्षकांची वाढती रुची हा खऱ्या अर्थाने सुखद बदल आहे. आता संघातील प्रत्येक खेळाडू घराघरात ओळखली जाऊ लागली आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्याच्या आठवणींनाही स्मृतीने उजाळा दिला. पावसाची संततधार सुरू असतानाही चाहत्यांनी हॉटेलबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय संघाला निरोप दिला होता. याबाबत बोलताना ती म्हणाली, “तो क्षण अतिशय अविस्मरणीय होता. पाऊस पडत असतानाही हॉटेलबाहेर आमच्या बसजवळ जवळपास एक हजार चाहते आम्हाला निरोप देण्यासाठी उभे होते. पावसात भिजत असतानाही चाहत्यांनी आमच्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचा हा उत्साह आणि प्रेम पाहून आम्हाला खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली.”
दरम्यान, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ८७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करण्यासोबतच दोन बळी मिळवणाऱ्या शेफाली वर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तिने स्मृतीसोबतच्या सलामीच्या भागीदारीविषयीही मनमोकळेपणाने भाष्य केले.
शेफाली म्हणाली की, २०१९ पासून दोघी एकत्र खेळत असल्याने मैदानावर एकमेकींना चांगल्या प्रकारे समजून घेतात. आता तर अनेकदा शब्दांचीही गरज भासत नाही. केवळ डोळ्यांच्या इशाऱ्यावरून एकमेकींना काय सांगायचे आहे, हे समजते. मैदानावर किती संवाद साधायचा आणि संघाला नेमकी कशाची गरज आहे, याची दोघींनाही चांगली जाणीव असते. आमच्या भागीदारीत हेच समन्वयाचे वैशिष्ट्य दिसून येते आणि त्याचा संघाला फायदा होतो, असेही तिने सांगितले.
