भारताची स्टार पॅरा तिरंदाज शीतल देवीने वर्ल्ड आर्चरी पॅरा सीरिज २०२६मध्ये दमदार कामगिरी करत कंपाउंड महिला वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सोमवारी झालेल्या उपांत्य फेरीत शीतलने आपलीच सहकारी सरिताचा १४५-१४३ असा अटीतटीच्या लढतीत पराभव केला.
आता अंतिम फेरीत शीतलसमोर कझाकिस्तानच्या आयजादा सेइडनचे आव्हान असणार आहे. सुवर्णपदकासाठी ही लढत बुधवारी रंगणार आहे. दुसरीकडे, सरिताला कांस्यपदकासाठी चीनच्या वांग हुइटिंगशी सामना करावा लागणार आहे.
पात्रता फेरीतच शीतलचा विक्रम
शीतलने या स्पर्धेची सुरुवातच विक्रमी कामगिरीने केली होती. पात्रता फेरीत तिने ६९८ गुण मिळवत मोसमातील सर्वोत्तम स्कोअर नोंदवला. यासोबतच तिने स्वतःचाच आशियाई विक्रम एका गुणाने सुधारला.
या फेरीत शीतलने तब्बल २५ वेळा १० गुणांचा आणि २६ वेळा ‘एक्स’चा स्कोअर केला. तिच्या अचूक निशाण्यामुळे ती पात्रता फेरीत इतर स्पर्धकांपेक्षा तब्बल १० गुणांनी आघाडीवर होती.
१९ वर्षीय शीतलची ही कामगिरी आगामी आयची-नागोया २०२६ आशियाई पॅरा गेम्सच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. या स्पर्धेत ती कंपाउंड महिला वैयक्तिक आणि मिश्र सांघिक या दोन्ही प्रकारांतील जेतेपदाचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
शीतल-राकेश जोडीचा विश्वविक्रम
शीतलने केवळ वैयक्तिक स्पर्धेतच नव्हे, तर मिश्र सांघिक प्रकारातही आपली ताकद दाखवली आहे. अनुभवी तिरंदाज राकेश कुमारसोबत तिने १,४०० गुणांची कमाई करत नवा विश्वविक्रम नोंदवला.
या जोडीने पॅरिस २०२४ पॅरालिम्पिकमध्ये केलेला स्वतःचाच विश्वविक्रम एका गुणाने मागे टाकला. पॅरिसमध्ये या जोडीने मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.
शीतलने लालपतिसोबत १,३६८ गुण मिळवत कंपाउंड महिला डबल्समध्येही अव्वल मानांकन मिळवले आहे.
पुरुषांच्या गटातही भारताची आगेकूच
कंपाउंड पुरुष वैयक्तिक प्रकारात विद्यमान विश्वविजेता टोमन कुमार कांस्यपदकासाठी इराकच्या अब्बास काधिमविरुद्ध खेळणार आहे. काधिमने यापूर्वी भारताच्या राकेश कुमारला पराभूत केले होते.
दरम्यान, राकेश आणि टोमन यांनी कंपाउंड पुरुष डबल्समध्ये १,३९८ गुण मिळवत अव्वल मानांकन पटकावले आहे.
शीतल देवीच्या अचूक निशाण्याने अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा भारताचा तिरंगा उंचावण्याची आशा निर्माण झाली असून, आता तिच्या नजरा थेट सुवर्णपदकावर आहेत.
