घरविशेषतिरुपती बालाजीला १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण

तिरुपती बालाजीला १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण

किंमत तब्बल १६० कोटी रुपये

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात एका भक्ताकडून तब्बल १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण करण्यात येणार आहेत. या सुवर्णदानाची अंदाजित किंमत १५० ते १६० कोटी रुपये असून, तिरुपती मंदिराच्या इतिहासातील एखाद्या व्यक्तीकडून करण्यात येणारे हे सर्वात मोठे दागिन्यांचे दान ठरण्याची शक्यता आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी हा सुवर्णनजराणा भगवान व्यंकटेश्वरांच्या चरणी अर्पण केला जाणार आहे. या सोहळ्याला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या दानाचे वैशिष्ट्य म्हणजे १२१ किलो सोन्यापासून तब्बल ४५ आकर्षक दागिने तयार करण्यात आले आहेत. त्यांची नऊ स्वतंत्र संचांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भगवान व्यंकटेश्वरांच्या दैनंदिन पूजेसाठी आणि विशेष धार्मिक विधींसाठी या दागिन्यांचा वापर केला जाणार आहे. या दानासंदर्भात भक्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानम अर्थात टीटीडी प्रशासनाशी आवश्यक चर्चा पूर्ण केली असून, २६ नोव्हेंबरला मंदिर प्रशासनाकडे हे दागिने सुपूर्द केले जाणार आहेत.
हे ही वाचा:
रशिया-युक्रेन युद्धात ४.९० लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू

भारताचा आर्थिक विकासदर सलग दोन वर्षे ७ टक्क्यांवर राहणार

लघुउद्योगांच्या व्यवसायाची दुसऱ्या तिमाहीत १८.८ टक्क्यांची दमदार वाढ

स्वयंपाकघरातील तेलाला महागाईचा ‘तडका’

या भव्य दानामागे एक रंजक व्यावसायिक कहाणीही आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वी या भक्ताच्या दानामागील कारण उघड केले होते. संबंधित भक्ताने भगवान व्यंकटेश्वरांच्या नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीला मोठे व्यावसायिक यश मिळाल्यानंतर त्याने कंपनीतील ६० टक्के हिस्सा तब्बल १.५ अब्ज डॉलरला विकला. या व्यवहारातून मोठी संपत्ती मिळाल्यानंतर, हे यश भगवान व्यंकटेश्वरांच्या आशीर्वादामुळे मिळाले असल्याची भावना व्यक्त करत त्यातील काही संपत्ती देवाच्या चरणी अर्पण करण्याचा निर्णय त्याने घेतला.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेचे दान करणाऱ्या या भक्ताने आपली ओळख मात्र गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. आपले नाव जाहीर करू नये, असे पत्रही त्याने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पाठवले होते. आणखी एक विशेष बाब म्हणजे भगवान व्यंकटेश्वरांच्या अलंकारांचे पारंपरिक वजन सुमारे १२० किलो असल्याची माहिती आहे. मात्र, भक्ताने याची कल्पना नसतानाही १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. श्रद्धा, कृतज्ञता आणि संपत्तीचा काही भाग समाजाच्या आणि अध्यात्माच्या कार्यासाठी अर्पण करण्याची भावना यांचा संगम असलेले हे दान आता देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version