घरविशेषमहेश ट्युटोरियल्सच्या ३३ शाखांना टाळे; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

महेश ट्युटोरियल्सच्या ३३ शाखांना टाळे; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

पालकांमध्ये संतापाचे वातावरण

महाराष्ट्रातील नामांकित कोचिंग संस्था महेश ट्युटोरियल्सने राज्यभरातील आपल्या ३३ शाखांचे कामकाज अचानक बंद केल्याने हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांकडून शुल्कही घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर अचानक शाखा बंद करण्यात आल्याने सुमारे अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी आणि शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत आले आहेत.

माहितीनुसार, ७ जुलै रोजी शाखा प्रमुखांची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर १० जुलैपासून राज्यातील सर्व ३३ शाखांचे कामकाज थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीच २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश पूर्ण झाले होते आणि पालकांकडून संपूर्ण शुल्कही जमा करण्यात आले होते. त्यामुळे अचानक वर्ग बंद झाल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

महेश ट्युटोरियल्सची मूळ कंपनी एमटी एज्युकेअर लिमिटेड डिसेंबर २०२२ पासून कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस (CIRP) अर्थात दिवाळखोरी प्रक्रियेत आहे. कंपनीवर सुमारे ७४.२९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक अडचणींमुळेच शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक पालकांनी इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमासाठी १.८० लाख ते २.४० लाख रुपये, तर दीर्घकालीन अभ्यासक्रमांसाठी ४ ते ५ लाख रुपये शुल्क भरल्याचा दावा केला आहे. मात्र, संस्थेकडे फी परत करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याचे सांगण्यात आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेकांना आता दुसऱ्या क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुन्हा मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे.

संस्कृती जीवन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप मागरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था, फीचे लेखापरीक्षण, प्रमाणानुसार शुल्क परतावा आणि शिक्षकांचे थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे. तसेच, खासगी कोचिंग संस्थांसाठी स्वतंत्र नियामक व्यवस्था उभी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुंबई लोकलमध्ये ‘सीट वॉर’चा कळस; महिला डब्यात पेपर स्प्रे फवारला

पाणबुड्यांचा ‘कर्दनकाळ’ भारताच्या ताफ्यात; MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर दाखल

हरित रेल्वे क्रांतीची नांदी; पहिली हायड्रोजन ट्रेन जींदहून सोनीपतसाठी रवाना

SIR मोहिमेदरम्यान महिला बीएलओशी गैरवर्तन; चार आरोपी गजाआड

दरम्यान, अरिहंत अकादमीने महेश ट्युटोरियल्समधील प्रभावित विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिकवणी शुल्क न आकारता प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. तसेच, नोकरी गमावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही रोजगाराची संधी देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, संस्थेने महेश ट्युटोरियल्सचा ताबा घेतलेला नसून केवळ मानवतावादी भूमिकेतून मदत केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version