घरविशेष‘नो एंट्री’ पुलावर बर्थडे पार्टी! २६ कोटींच्या पुलावर वाढदिवसाचा धुमाकूळ

‘नो एंट्री’ पुलावर बर्थडे पार्टी! २६ कोटींच्या पुलावर वाढदिवसाचा धुमाकूळ

व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

बिहारमधील बक्सर येथे एक धक्कादायक आणि तितकाच आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या सुमारे २६.४ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इटाढी रोड ओव्हरब्रिज (ROB) वर एका कुटुंबाने थाटामाटात वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला. पुलावर स्टेज, टेंट, प्रकाशयोजना आणि डीजेसह नाचगाण्याचा कार्यक्रम झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

माहितीनुसार, हा पूल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या चार दिवसांत पुलाच्या एका भागात तांत्रिक दोष आढळला. पिलर क्रमांक ५ जवळील स्लॅब खचल्याने आणि एक्स्पान्शन जॉइंटमध्ये गंभीर बिघाड झाल्याने प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव पुलावरील वाहतूक तातडीने बंद केली. त्यानंतर पुलावर दुरुस्तीचे काम सुरू असून सामान्य नागरिक आणि वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत बंद पुलावर एका कुटुंबाने वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पुलावर मोठा टेंट उभारलेला, रंगीबेरंगी दिव्यांची सजावट, स्टेज आणि डीजेच्या तालावर नाचगाणे सुरू असल्याचे दिसते. कार्यक्रमासाठी अनेक लोक उपस्थित असल्याचेही व्हिडिओत दिसून येते.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ज्या पुलावर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद आहे, त्याच पुलावर वाढदिवस साजरा करण्याची परवानगी कशी मिळाली? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. कार्यक्रमासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती का, सुरक्षा यंत्रणा कुठे होती आणि बंदिस्त परिसरात इतक्या लोकांना प्रवेश कसा मिळाला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे ही वाचा:

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर तात्पुरती बंदी

“श्रीकृष्ण मुस्लिम होते, दिवसातून पाच वेळा नमाज पढत होते” मौलाना बरळले

दुसरीतील हिंदू विद्यार्थ्याला ‘कलमा’ पठणाचा गृहपाठ; शिक्षिकेची हकालपट्टी

‘अतिथी देवो भव’! महिला पोलिसांच्या मदतीने विदेशी पर्यटक भारावली

दरम्यान, पुलाच्या दुरुस्तीला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले आहे. सुरुवातीला १५ दिवसांत दुरुस्ती पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तपासणीत दोष अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाल्याने आता अनेक महिने लागू शकतात. सध्या तीन ठिकाणी एक्स्पान्शन जॉइंट नव्याने तयार करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे बिहारमधील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेबरोबरच सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version