भारतात डेंग्यूविरोधातील पहिली लस लवकरच उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जपानच्या ताकेदा फार्मास्युटिकल्सने विकसित केलेली ‘क्यूडेंगा’ ही लस २०२७ च्या पहिल्या सहामाहीत भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या लसीच्या भारतातील वितरणासाठी ताकेदाने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत करार केला आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने म्हणजेच सीडीएससीओने जुलै २०२६ मध्ये या लसीला भारतात विक्रीची मंजुरी दिली आहे.
क्यूडेंगा ही लस डेंग्यूच्या चारही प्रकारांपासून संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. भारतात ही लस ४ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी मंजूर करण्यात आली असून, तिचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. या दोन डोसमध्ये तीन महिन्यांचे अंतर ठेवावे लागेल. विशेष म्हणजे, लस घेण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला यापूर्वी डेंग्यूचा संसर्ग झाला आहे की नाही, याची तपासणी करणे आवश्यक नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
काश्मीरच्या पर्यटनाला बहर; तीन महिन्यांत ८ लाखांहून अधिक पर्यटक
भारतात ५ मोठ्या चिप उत्पादक कंपन्या उभारण्याचे लक्ष्य
‘खेलो इंडिया’ बॉक्सिंग सेंटरसाठी होणार ३० खेळाडूंची निवड
वॉरेन बफे यांचा बर्कशायर हॅथवेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
सध्या ही लस खासगी बाजारपेठेत उपलब्ध करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, तिची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. आयात, नोंदणी आणि इतर नियामक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लसीच्या उपलब्धतेबाबत अंतिम चित्र स्पष्ट होईल. भारतात दरवर्षी डेंग्यूची अनेक प्रकरणे समोर येत असल्याने या लसीकडे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. मात्र, लस उपलब्ध झाल्यानंतरही डासांची उत्पत्ती रोखणे, घराच्या आसपास पाणी साचू न देणे आणि डासांपासून संरक्षण करणे हे प्रतिबंधात्मक उपाय तितकेच महत्त्वाचे राहणार आहेत.
