जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी बर्कशायर हॅथवेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ कंपनीच्या नेतृत्वात राहिल्यानंतर वयाच्या ९६व्या वर्षी बफे यांनी अध्यक्षपद सोडले असून, आता त्यांचे पुत्र हॉवर्ड बफे बर्कशायर हॅथवेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. कंपनीने १८ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत अधिकृत माहिती दिली. या बदलानंतर वॉरेन बफे यांना ‘चेअरमन एमेरिटस’ ही मानद भूमिका देण्यात आली असून ते कंपनीच्या संचालक मंडळावर कायम राहणार आहेत.
बर्कशायर हॅथवेच्या नेतृत्वातील हा बदल आधीपासून आखलेल्या उत्तराधिकार योजनेचा भाग आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग एबेल हे दैनंदिन कारभार आणि महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय सांभाळत राहतील, तर हॉवर्ड बफे यांच्यावर कंपनीची संस्कृती आणि मूल्ये जपण्याची जबाबदारी असेल. हॉवर्ड बफे हे १९९३ पासून बर्कशायरच्या संचालक मंडळावर आहेत. कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार, वॉरेन बफे यांनी ग्रेग एबेल यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, कंपनीच्या पुढील वाटचालीबाबत ते आशावादी असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
अजित आगरकरना मुदतवाढ की नवे निवडसमिती प्रमुख?
एनएससईच्या आयपीओला दुसऱ्याच दिवशी तुफान प्रतिसाद
परकीय चलनसाठ्यात ४.९२ अब्ज डॉलरची घट
थेट करसंकलनातून सरकारच्या तिजोरीत ₹१२.१० लाख कोटी जमा
वॉरेन बफे यांनी १९६५ मध्ये बर्कशायर हॅथवेच्या नेतृत्वाशी जोडले गेल्यानंतर कंपनीला विमा, ऊर्जा, रेल्वे, उत्पादन आणि गुंतवणूक अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या व्यावसायिक समूहात रूपांतरित केले. आज बर्कशायर हॅथवेचा व्यवसाय सुमारे एक ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे. अध्यक्षपद सोडल्यानंतरही बफे कंपनीपासून पूर्णपणे दूर जाणार नसून, संचालक म्हणून त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन बर्कशायरला मिळत राहणार आहे.
