मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरताना पकडल्या गेल्यानंतर काही तासांतच संबंधित विद्यार्थी मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सुरू असलेल्या मध्य-सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मृत विद्यार्थी साहिल वाकोडे हा आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. संस्थेच्या अधिकृत माहितीनुसार, परीक्षेदरम्यान तो मोबाईल फोन वापरताना आढळला होता. त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड करून उत्तरांचा शोध घेतल्याचेही संस्थेने म्हटले आहे. मात्र, या घटनेनंतर विद्यार्थ्याविरोधात कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असा दावा आयआयटी मुंबईने केला आहे. संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले होते. तसेच या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, असे आश्वासनही देण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थी आपल्या वसतिगृहातील खोलीत परतला आणि नंतर तो मृतावस्थेत आढळला, असे संस्थेने म्हटले आहे.
हे ही वाचा:
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनाला पुन्हा बहर
इस्रायलला माहिती दिल्याच्या आरोपात इराणी नागरिकाला फाशी
११ टन साहित्य घेऊन नेपाळसाठी नववे विमान रवाना
एझिमला नौदल अकादमीतून बांगलादेशी नागरिकाला अटक
विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर कॅम्पसमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आले. ४००हून अधिक विद्यार्थ्यांनी आंदोलन करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आत्महत्येसारखी गंभीर घटना घडल्यानंतरही प्रशासनाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहते, अशी विद्यार्थ्यांची तक्रार असल्याचे समोर आले आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी मध्य-सत्र परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानंतर सुरू असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर आयआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांना आणि घटनेमुळे प्रभावित झालेल्या मित्र, वर्गमित्र व प्राध्यापकांना मदत केली जात असल्याचे म्हटले आहे. मृत्यूच्या परिस्थितीची संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
