इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली इराणने होसैन पदरान या इराणी नागरिकाला फाशी दिली आहे. इराणच्या न्यायव्यवस्थेच्या माहितीनुसार, पदरानने इस्फहान प्रांतातील संवेदनशील लष्करी ठिकाणे आणि क्षेपणास्त्र तळांशी संबंधित गोपनीय माहिती इस्रायलपर्यंत पोहोचवली होती.
इराणच्या न्यायव्यवस्थेच्या म्हणण्यानुसार, पदरानवर हेरगिरी आणि परदेशी शक्तीसोबत गुप्तचर सहकार्य केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली. कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही मृत्युदंड कायम ठेवला. त्यानंतर पदरानला फाशी देण्यात आली.
हे ही वाचा:
११ टन साहित्य घेऊन नेपाळसाठी नववे विमान रवाना
एझिमला नौदल अकादमीतून बांगलादेशी नागरिकाला अटक
अजित आगरकरना मुदतवाढ की नवे निवडसमिती प्रमुख?
तीन बड्या वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसचे दरवाजे बंद!
इराणी न्यायव्यवस्थेचा दावा आहे की, पदरानने मध्य इराणमधील इस्फहान प्रांतातील संवेदनशील लष्करी ठिकाणांशी संबंधित माहिती विदेशी गुप्तचर संस्थांना दिली होती. यामध्ये क्षेपणास्त्र तळांची माहितीही असल्याचे सांगण्यात आले आहे. या माहितीच्या बदल्यात त्याला आर्थिक फायदा मिळाल्याचा आरोपही इराणकडून करण्यात आला आहे. इराणी अधिकाऱ्यांच्या मते, अलीकडील १२ दिवसांच्या युद्धादरम्यान देशातील अनेक संवेदनशील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात परदेशी गुप्तचर संस्थांना संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. याच तपासादरम्यान पदरानचे नाव समोर आल्याचे इराणच्या न्यायव्यवस्थेने म्हटले आहे.
