घरविशेष'ते आम्हाला चोर म्हणतील अशी अपेक्षा नव्हती'

‘ते आम्हाला चोर म्हणतील अशी अपेक्षा नव्हती’

पंतप्रधान मोदींच्या टीकेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (२६ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीएमसीला “चोर” असे संबोधणाऱ्या अलीकडील विधानांवर टीका केली आणि म्हटले की त्यांनी खुर्चीचा आणि राज्याचा अनादर करू नये. सामाजिक कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप करण्यासाठी आयोजित वर्धमान शहरात एका सरकारी कार्यक्रमात बोलताना बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींच्या टिप्पण्या ह्या पश्चिम बंगालच्या लोकांचा “अपमान” असल्याचे म्हटले आहे.

“पंतप्रधानांनी माझ्या खुर्चीचा आदर केला पाहिजे, जसा मी त्यांच्या खुर्चीचा आदर करते. मला कधीच अपेक्षा नव्हती की ते पश्चिम बंगालच्या लोकांना ‘चोर’ म्हणतील,” असे मुख्यमंत्री म्हणाल्या. “खरं तर, त्यांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमधील ‘डबल-इंजिन’ भाजप सरकारांच्या कामगिरीकडे डोळेझाक केली आहे, जिथे भ्रष्टाचार सर्वाधिक आहे,” असा दावा बॅनर्जी यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे झालेल्या जाहीर सभेत म्हटले होते की, “भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि तृणमूल काँग्रेस हे समानार्थी आहेत.” त्यांनी आरोप केला की, “केंद्र पश्चिम बंगाल सरकारला पाठवणारा निधी लोकांपर्यंत पोहोचत नाही तर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते तो गिळंकृत करतात.”

मुख्यमंत्री बॅनर्जी पुढे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी “प्रत्येक वेळी निवडणूक जवळ आल्यावर स्थलांतरित पक्ष्यासारखे” पश्चिम बंगालमध्ये प्रवास करतात. कल्याणकारी योजनांसाठी केंद्रीय निधीच्या वापराबद्दल केंद्र सरकारच्या सर्व प्रश्नांना राज्य प्रशासनाने समाधानकारक उत्तरे दिली आहेत. तरीही निधी थांबवल्याचा आरोप त्यांनी केला.

“आम्ही केंद्र सरकारकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत, तरीही तुम्ही निधी वाटप थांबवता आणि पश्चिम बंगालला ‘चोर’ म्हणता. त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी १८६ केंद्रीय तपास पथके राज्यात पाठवली होती. मात्र, त्यांना काहीच ठोस पुरावे सापडले नाहीत. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरही जर आपल्याला शून्य गुण दिले जात असतील, तर कोणताही विद्यार्थी हे अन्यायकारक मूल्यमापन कसे स्वीकारू शकेल?, हा अपमान आम्ही सहन करणार नाही,” असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version