जगभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून, दुबईपासून अमेरिकेतील व्हाइट हाऊसपर्यंत सर्वत्र दीपोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. अनेक देशांतील भारतीय दूतावासांनी दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत भारतीय संस्कृतीची झलक जगासमोर मांडली.
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पारंपरिक पद्धतीने दिवा प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात भारतीय वंशाच्या अमेरिकन समुदायातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग घेतला. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा हेदेखील यावेळी ओव्हल ऑफिसमध्ये उपस्थित होते. दुबईमध्येही जागतिक समुदायाने एकत्र येत दिवाळीचा उत्सव साजरा केला. दुबईतील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने ‘एफओआय इव्हेंट्स’च्या सहकार्याने जागतिक दिवाळी महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विविध देशांचे राजनयिक, संयुक्त अरब अमिरातीचे अधिकारी आणि भारतीय समुदायातील नागरिक सहभागी झाले होते.
सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मैत्रीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुबईमध्ये दिवाळी उत्सवाचा भाग म्हणून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विविध देशांच्या सहभागातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्रीलंका, इंडोनेशिया, नेपाळ, मलेशिया आणि थायलंड या देशांचे विशेष स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून संबंधित देशांमधील दिवाळीशी निगडित परंपरा आणि प्रथा प्रदर्शित करण्यात आल्या.
भारतातील युरोपीय महासंघाचे राजदूत जीन एरिक यांनीही पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली. त्याचबरोबर कुवेतमधील भारतीय दूतावासाने भारतीय आणि कुवेती परंपरांचा अनोखा संगम घडवत दिवाळीचा उत्सव साजरा केला. कुवेतमधील भारतीय दूतावासाने इंडिया हाऊसमध्ये ‘दिवाळी दिवानिया’ या नावाने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात दिवाळीचा उत्सव आणि कुवेतमधील पारंपरिक ‘दिवानिया’ संस्कृती यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. भारत आणि कुवेत यांच्यातील राजनैतिक संबंधांना ६५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातून दोन्ही देशांमधील मैत्री आणि सांस्कृतिक संबंधांचे दर्शन घडले.
हे ही वाचा:
मध्य जपानमध्ये ५.७ तीव्रतेचा भूकंप; २२ जण जखमी
…ही नक्षलवादावरील संपूर्ण विजयानंतरची पहिली दिवाळी
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून सुरू
चीनचा धोका म्हणूनच सियांग धरणाचे धोरण
रॉयल नॉर्वेजियन दूतावासानेही दिवाळीचा उत्सव साजरा केला. यानिमित्त दूतावासाने ‘एक्स’वर संदेश प्रसिद्ध करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ‘नॉर्वेजियन दूतावासही दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाला आहे. सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांतता आणि समृद्धी नांदो,’ अशी सदिच्छाही दूतावासाने व्यक्त केली. इस्रायलमधील भारतीय दूतावासानेही तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसह स्थानिक मित्रमंडळींच्या उपस्थितीत दिवाळी साजरी केली. यावेळी सर्वांना शुभेच्छाही देण्यात आल्या. दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात आशा, आनंद आणि सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन येवो. सर्वांच्या आयुष्यात सद्भावना आणि समृद्धी नांदो.’
