घरविशेषमहाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी, पण धोका कायम

महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली असून राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने (IMD) बुधवार, ८ जुलै रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या नेरळ-भिवपुरी दरम्यान रुळांवर पाणी साचल्याने लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि काही विदर्भातील भागांत पुढील २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः सह्याद्री परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महाबळेश्वर, कोयना, नवजा आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये अवघ्या ४८ तासांत ९०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी, पण धोका कायम

मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे. अधूनमधून जोरदार सरी, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचण्याची तसेच झाडे कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसला असून नेरळ आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. काही लोकल गाड्या उशिराने धावल्या, तर काही सेवा तात्पुरत्या थांबवाव्या लागल्या. या परिस्थितीमुळे कर्जत, कसारा आणि खोपोली मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने रुळांवरील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू केली.

हे ही वाचा:

इराणला तेलविक्रीवर दिलेली सूट रद्द; होर्मुझ हल्ल्याचा दणका

बिश्नोई टोळीवर निज्जरच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप

नवी मुंबईत भरधाव कारने १० जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

“ट्रम्पना बगराम तळ फक्त स्वप्नातच मिळेल” तालिबान मंत्र्यांचा टोला

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, स्थानिक प्रशासन, महापालिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डोंगराळ भाग, नदीकाठची गावे आणि भूस्खलनप्रवण क्षेत्रांतील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे नद्या आणि धरणांतील पाणीसाठाही झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version