मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे या सहा तासांच्या कालावधीत विमानतळावरील सर्व विमान वाहतूक पूर्णपणे स्थगित राहणार आहे. जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावरील या नियोजित बंदचा परिणाम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवांवर होण्याची शक्यता आहे.
विमानतळावरील सुरक्षितता, कार्यक्षमता आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यानंतर धावपट्ट्यांची विशेष देखभाल केली जाते. यंदाही या नियमित प्रक्रियेअंतर्गत दोन्ही धावपट्ट्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये धावपट्टीच्या पृष्ठभागाची तपासणी, आवश्यक दुरुस्ती, दिव्यांची देखभाल तसेच पावसाळ्यात साचलेला कचरा आणि इतर अडथळे हटविण्याच्या कामांचा समावेश आहे. विमानांच्या सुरक्षित उड्डाण आणि लँडिंगसाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची मानली जातात.
हे ही वाचा:
लोकलमधील तरुणींचे गुपचूप व्हिडिओ काढून AI द्वारे मॉर्फिंग करणाऱ्या अटक
तिसरीच्या विद्यार्थ्याचा केजीतील चिमुरडीवर जीवघेणा हल्ला
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पत्रकार निधी रझदान यांच्याशी थाटणार संसार!
भारताच्या नाविकला बळ देणारा एनव्हीएस-०३
दरम्यान, या सहा तासांच्या कालावधीत विमानतळावरील संपूर्ण हवाई वाहतूक बंद राहणार असल्याने विमान कंपन्यांना आपल्या उड्डाणांचे वेळापत्रक त्यानुसार निश्चित करावे लागणार आहे. प्रवाशांनी १९ नोव्हेंबर रोजी प्रवासाचे नियोजन करताना संबंधित विमान कंपनीकडून उड्डाणांची वेळ आणि संभाव्य बदलांची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. नियोजित देखभाल आणि दुरुस्तीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून विमानतळावरील सेवा पुन्हा सुरळीत सुरू करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
