घरविशेषकोकणासह राज्यांतर्गत सेवांना फटका; उत्तर भारतासाठी मात्र विशेष गाड्यांचा वर्षाव

कोकणासह राज्यांतर्गत सेवांना फटका; उत्तर भारतासाठी मात्र विशेष गाड्यांचा वर्षाव

रेल्वेवर दुजाभावाचे आरोप

रेल्वे विभागाने लागू केलेल्या “शून्य आधारित वेळापत्रक” (Zero-Based Timetable) धोरणामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राज्यांतर्गत रेल्वेगाड्यांवर गंडांतर आले असून प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या धोरणाअंतर्गत कमी प्रवासी असलेल्या किंवा समांतर मार्गांवर धावणाऱ्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील अंतर्गत रेल्वे सेवांना बसल्याचे दिसून येत आहे.

या नव्या वेळापत्रकामुळे मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर यांसारख्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्गही अंशतः कमी करण्यात आले आहेत. विशेषतः दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही महत्त्वाची गाडी बंद करून तिच्या ऐवजी दिवा-रत्नागिरी अशी सेवा सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
होर्मुझवरून महासंघर्षाची चिन्हे! ट्रम्पचा इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम

मोदींच्या ‘ऍक्ट ईस्ट पॉलिसी’चा गेमचेंजर: शिलाँग–सिलचर महामार्ग

भारतात धुरंधरची धूम; पाकिस्तानात दहशतवाद्याचा काटा काढला

जूनमध्ये ‘या’ देशात उतरणार टीम इंडिया

या निर्णयामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक, व्यावसायिक आणि धार्मिक कारणांसाठी या रेल्वेगाड्यांवर अवलंबून असलेले हजारो प्रवासी अडचणीत आले आहेत. रेल्वेगाड्या बंद केल्यामुळे प्रवाशांना पर्यायी सोयींचा अभाव जाणवत असून त्यांना अधिक वेळ, पैसा आणि त्रास सहन करावा लागत आहे.

याउलट, उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. होळी आणि उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन गोरखपूर, बलिया, दाणापूर, सहरसा अशा मार्गांवर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्या दररोज किंवा आठवड्यातून अनेक वेळा धावत आहेत, तर महाराष्ट्रातील गाड्या मात्र साप्ताहिक करण्यात आल्या आहेत. यामुळे “रेल्वे प्रशासनाचा दुजाभाव” होत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

कोकण विकास समिती आणि प्रवासी संघटनांनी या धोरणावर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या मते, कोकण रेल्वे मार्गासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध असूनही स्थानिक गाड्या बंद करून बाहेरील राज्यांच्या गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांच्या गरजा दुर्लक्षित होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version