सांगली सहकारी बँकेला बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘बेस्ट नॉन-परफॉर्मिंग ऍसेट (एनपीए) रिकव्हरी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेने थकीत कर्जाचे प्रमाण ७० टक्क्यांवरून शून्यावर आणत आर्थिक स्थितीत सुधारणा केल्याबद्दल हा सन्मान मिळाला.
आरबीआय आणि नाबार्डचे माजी संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते सांगली सहकारी बँकेचे चेअरमन चंद्रकांत जाधव, संचालक हेमंत शिंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला. एनपीए शून्यावर करून बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यात यश आल्याचे हेमंत शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, सांगली सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत हेमंत शिंदे यांच्यासह १४ जणांची बिनविरोध निवड झाली होती. या पार्श्वभूमीवर बँकेला मिळालेला पुरस्कार महत्त्वाचा मानला जात आहे. १९६४ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेचे संस्थापक शिवाजीराव शिंदे हे हेमंत शिंदे यांचे वडील होते. त्यांनी २०१० पर्यंत बँकेच्या उभारणीत आणि विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली.
हे ही वाचा:
अमित देशमुखांकडून टिपू सुलतानचा उदो उदो!
अखिलेश अयोध्येत उतरले तर मीही भिडणार; योगींचा हुंकार!
इस्रायलवरून राहुल गांधींची पलटी
GTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा
पूर्वी ‘सांगली जिल्हा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेची सुरुवात मुंबईतील गिरणी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन झाली. सध्या मुंबईत दादर, मालाड, विक्रोळी, गोवंडी आणि गिरगाव येथे बँकेच्या शाखा आहेत. बँकेचे सुमारे २७ हजार सभासद आहेत. मूळचे बांधकाम व्यावसायिक, इंजीनिअर असलेले हेमंत शिंदे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. संचालकपदी निवड झाल्यानंतर हेमंत शिंदे यांनी बँकेचा विस्तार, कर्जवसुली, ग्राहकहिताचे निर्णय आणि कामकाजात वेगाने सुधारणा करण्यावर भर दिला. काळाबरोबर बदल करायला पाहिजे, प्रगतीसाठी बदल हे अपेक्षित असतात आणि ते करायलाच पाहिजे, हेच उद्दिष्ट समोर ठेवून सांगली सहकारी बँकेने कात टाकली आणि आज ही बँक यशोशिखरावर जाऊन पोहोचली आहे.
