घरविशेषSIR योजनेमुळे पश्चिम बंगालमध्ये दोन भाऊ ३७ वर्षांनी भेटले!

SIR योजनेमुळे पश्चिम बंगालमध्ये दोन भाऊ ३७ वर्षांनी भेटले!

घरातले दुःख सरले, आला आनंद

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवर पश्चिम बंगालभर तापलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर, पुरुलियातील एका छोट्या गावात या प्रशासकीय उपक्रमामुळे एक विलक्षण घटना घडली. कागदोपत्री औपचारिकतेशी जोडल्या जाणाऱ्या या प्रक्रियेमुळे जवळपास चाळीस वर्षांपासून वेगळे झालेल्या एका कुटुंबाची पुनर्भेट घडून आली.

आयुष्यभर शोधूनही कुठेच पत्ता न लागलेल्या विवेक चक्रवर्ती या त्यांच्या मोठ्या मुलाबद्दल कुटुंबाने जवळपास आशाच सोडली होती. १९८८ मध्ये घर सोडून गेलेल्या विवेकचा कोणताही माग सापडत नव्हता. वर्षानुवर्षे शोध घेतल्यानंतरही उत्तर मिळाले नाही; मोठ्या मुलाच्या बेपत्ता होण्यामुळे घरात दुःखाचे वातावरण होते..

मात्र नियतीने SIR प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एक अशक्य वाटणारे दार पुन्हा उघडले. या चमत्काराची सुरुवात एका नेहमीच्या सरकारी फॉर्ममधून झाली—आणि एका भावाच्या शांत परंतु अथक कर्तव्यनिष्ठेमुळे. छोटा भाऊ प्रदीप चक्रवर्ती हा त्यांच्या परिसराचा बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आहे. SIR मोहिमेदरम्यान त्याचे नाव आणि फोन नंबर प्रत्येक घरात वितरित करण्यात आलेल्या फॉर्मवर छापलेले होते.

आणि एका साध्या फोन कॉलने सगळे बदलून गेले. कोलकात्यात राहणाऱ्या विवेकच्या मुलाने, कागदपत्रांच्या माहितीसंदर्भात प्रदीपला फोन केला. सुरुवातीला कोरड्या प्रशासकीय संवादासारखी वाटणारी ही चर्चा जसजशी पुढे गेली, तसतसे दोघांनी जोडून पाहिलेली कौटुंबिक माहिती अविश्वसनीय भावनिक रूप धारण करू लागली.

त्या क्षणाची आठवण सांगताना प्रदीप म्हणाला, “माझा भाऊ १९८८ मध्ये शेवटचा घरी आला होता. त्यानंतर तो गायब झाला. आम्ही सर्वत्र शोधलं. कदाचित अहंकार होता, कदाचित गैरसमज, पण त्याने सर्व नाती तोडली. या मुलाने विचारलेले प्रश्न आणि दिलेली उत्तरे आमच्या कुटुंबालाच माहीत असणारी होती. तेव्हा मला जाणवले—मी माझ्याच पुतण्याशी बोलत होतो.”

या शोधाचा भावनिक धक्का दोन्ही बाजूंना बसला. ३७ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रदीप त्याच्या मोठ्या भावाशी, विवेकशी, बोलला. दशकानुदशकांच्या शांततेला छेद देत दोन्ही भावांच्या आवाजांतून आनंद ओसंडून वाहत होता.

हे ही वाचा:

कढीपत्ता : आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी वरदान

जी-२० शिखर परिषद: सीमांवर बळाचा वापर अयोग्य; दहशतवादाचा निषेध

‘निवडणुकीत घोळ झालाय, पण पुरावा नाही!’

उकडलेली डाळ की फोडणीची डाळ?

फोनच्या दुसऱ्या टोकाला विवेक भावुक होत म्हणाला, “ही भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. ३७ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर मी पुन्हा घरी येत आहे. मी सर्वांसोबत बोललो आहे. मी आनंदाने भिजून गेलो आहे. या SIR प्रक्रियेअभावी ही भेट शक्यच झाली नसती. मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो.”

चक्रवर्ती कुटुंबीय आज खुश आहेत. एके काळी मोठ्या भावाच्या अचानक घरातून निघून जाण्याने दुःखीकष्टी बनलेले घर कृतज्ञतेने ओथंबून गेले आहे. त्यांच्या हृदयाला झालेल्या वेदनांवर एका सरकारी प्रक्रियेने अनपेक्षितपणे फुंकर घातली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version