आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात एका भाविकाने केलेल्या दानाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. चेन्नईतील उद्योजक वर्धमान जैन यांनी भगवान व्यंकटेश्वराच्या चरणी तब्बल १२१ किलो सोनं अर्पण केलं आहे. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास १६० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी हा दानविधी पार पडला. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पत्नी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः वर्धमान जैन यांचं स्वागत केलं. तिरुपती मंदिरात यापूर्वीही भाविकांकडून सोनं, चांदी, हिरे आणि मौल्यवान वस्तूंचं दान करण्यात आलं आहे. मात्र, एकाच वेळी १२१ किलो सोन्याचं दान केल्याने या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वर्धमान जैन यांनी दिलेल्या या दानामध्ये सोन्याचे मौल्यवान दागिने आणि भगवान बालाजींसाठी तयार करण्यात आलेल्या मुकुटाचाही समावेश आहे. २७ नोव्हेंबर रोजी हे दागिने भगवान व्यंकटेश्वरांना परिधान केले जाणार आहेत. त्यामुळे या दानाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी एक मानलं जातं. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. अनेक भाविक आपल्या श्रद्धेनुसार सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू अर्पण करतात. मात्र, १६० कोटी रुपयांच्या या सोन्याच्या दानामुळे मंदिरातील दानाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
हे ही वाचा:
आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोप निश्चितीचा आदेश कायम
गुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!
मुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!
माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!
वर्धमान जैन हे केवळ दानशूर उद्योजकच नाहीत, तर हेल्थकेअर टेक्नॉलॉजी क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक म्हणूनही ओळखले जातात. ते ‘अॅक्सेस हेल्थकेअर’ या कंपनीचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी चेन्नईतील लोयोला महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, मेडिकल कोडिंग, इमेज प्रोसेसिंग आणि रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन या क्षेत्रांत आपलं व्यावसायिक कौशल्य विकसित केलं. त्यांच्या कंपनीकडून आरोग्यसेवा क्षेत्राला तंत्रज्ञानाधारित सेवा पुरवल्या जातात.
वर्धमान जैन यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला २०२५ मध्ये मोठं यश मिळालं. त्यांनी आपल्या अॅक्सेस हेल्थकेअर कंपनीतील ७० टक्के हिस्सा एका अमेरिकन कंपनीला विकला. हा व्यवहार जवळपास २ अब्ज डॉलरचा असल्याचं वृत्त आहे. या व्यवहारामुळे जागतिक उद्योगविश्वातही त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. आता १२१ किलो सोन्याच्या दानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका बाजूला जागतिक स्तरावर व्यवसायाचा विस्तार आणि दुसऱ्या बाजूला आपल्या श्रद्धास्थानासाठी केलेलं कोट्यवधींचं दान, यामुळे वर्धमान जैन यांची ही भेट विशेष ठरली आहे.
