घरविशेषगोवा विशेष : आदिवासींचा त्रास वाचवण्यासाठी कुशवती होणार नवा जिल्हा!

गोवा विशेष : आदिवासींचा त्रास वाचवण्यासाठी कुशवती होणार नवा जिल्हा!

गोव्यात होणार आता तीन जिल्हे

गोव्याच्या दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासन अधिक जवळ मिळावे, यासाठी राज्य सरकारने ‘कुशवती’ नावाचा स्वतंत्र जिल्हा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत गोव्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोनच जिल्हे होते. मात्र दक्षिण गोव्यातील अंतर्गत भाग मोठा आणि प्रशासनावर ताण वाढत असल्याने तिसऱ्या जिल्ह्याची गरज भासू लागली होती.

नवीन कुशवती जिल्ह्यात सांगूये, धारबंदोरा, क्वेपेम आणि कनाकोना हे चार तालुके समाविष्ट असतील. या भागातील नागरिकांना सध्या जिल्हास्तरीय कामांसाठी लांब अंतराचा प्रवास करावा लागतो. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल, आरोग्य, शिक्षण किंवा इतर सरकारी सेवा मिळवणे कठीण जाते. त्यामुळे स्वतंत्र जिल्हा झाल्यास प्रशासन थेट गावांच्या जवळ येईल, अशी सरकारची भूमिका आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसची गटबाजी पुन्हा उघड

भारताविरुद्ध बहिष्कार; आयसीसीचा पाकिस्तानला कडक इशारा

बलुच बंडखोरांनी मारले १०० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक

गणेश खणकरांची भाजप गटनेतेपदी वर्णी

या भागात आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या बाबतीत हा भाग तुलनेने मागे राहिला आहे. स्वतंत्र जिल्हा झाल्यास विकास योजनांची अंमलबजावणी वेगाने होईल आणि स्थानिक गरजांनुसार निर्णय घेणे सोपे जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नव्या जिल्ह्यामुळे दक्षिण गोवा जिल्ह्यावरचा ताणही कमी होईल. विकासकामांचे नियोजन, निधी वाटप आणि योजनांचे निरीक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल. तसेच भविष्यात कुशवती जिल्ह्याला केंद्र सरकारच्या विविध विशेष योजनांचा लाभ मिळू शकतो.

मात्र या निर्णयासोबत काही आव्हानेही आहेत. नवीन जिल्ह्यासाठी स्वतंत्र कार्यालये, कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. तरीही सरकारच्या मते दीर्घकालीन विकासासाठी हा निर्णय आवश्यक आहे.

या जिल्ह्याला ‘कुशवती’ हे नाव कुशवती नदीवरून देण्यात आले आहे. ही नदी दक्षिण गोव्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे नावामागेही स्थानिक ओळख जपण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. एकूणच, कुशवती जिल्हा निर्माण झाल्यास गोव्याच्या अंतर्गत भागातील नागरिकांसाठी प्रशासन, विकास आणि संधी अधिक सुलभ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version