घरगुती वादातून पतीने स्वयंपाकघरातील सुऱ्याने पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची आणि त्यानंतर स्वतःचाही गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे आग्रीपाडा परिसरात घडली. या घटनेत पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालापाणी चौकीजवळ आज पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोहम्मद एहसान शेख (१९) आणि त्याची पत्नी जन्नत एहसान शेख (१९) हे दोघेही रोजंदारी मजूर म्हणून काम करत होते. आज पहाटे दोघांमध्ये घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या मोहम्मद एहसानने स्वयंपाकघरातील धारदार सुऱ्याने पत्नी जन्नत हिचा गळा चिरला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा:
‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! ७५ कोटींकडे झेप
टाटा मोटर्सच्या इव्हेको खरेदीचा मार्ग मोकळा
सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त
‘चीनवरील अवलंबित्वाचा धोका युरोपआधी भारताने ओळखला!’
पत्नीच्या हत्येनंतर मोहम्मदने त्याच सुऱ्याने स्वतःचाही गळा चिरून घेतला. घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मोहम्मदला तातडीने उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी मोहम्मद एहसान शेख याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला असून, त्याच्या मृत्यूबाबत अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात येत आहे. कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत
