टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेमीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किटसह बनावट तांत्रिक उपकरण बसवून प्रवाशांकडून जादा भाडे उकळणाऱ्या टोळीचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींवर कारवाई करत पाच टॅक्सी-रिक्षा जप्त केल्या आहेत. मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किटही पोलिसांनी हस्तगत केले आहे.
दहिसर परिसरातील टॅक्सी आणि रिक्षाचालक मीटरमध्ये तांत्रिक फेरफार करून कृत्रिमरीत्या भाडे वाढवत असल्याची माहिती दहिसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश साळुंके यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी या माहितीची पडताळणी सुरू केली.
१ सप्टेंबर रोजी सायंकाळी एका बनावट प्रवाशाला टॅक्सी क्रमांक MH 01 CJ 6487 मधून प्रवास करण्यासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी संबंधित टॅक्सीचालकाने भाडेमीटर झाकून ठेवला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी टॅक्सी आणि चालकाला ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन विभाग, बोरीवली यांच्याशी पत्रव्यवहार केला. आरटीओच्या माध्यमातून टॅक्सीची तपासणी केली असता मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किटच्या माध्यमातून बेकायदा छेडछाड करण्यात आल्याचे उघड झाले. या उपकरणामुळे मीटरमध्ये कृत्रिमरीत्या भाडेवाढ होत असल्याचे तपासात समोर आले. अधिक चौकशी केल्यानंतर आणखी चार टॅक्सी-रिक्षांच्या मीटरमध्येही अशाच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट बसवून छेडछाड केल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी पाच वाहनांसह मीटरमध्ये वापरलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली.
या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1293/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4) तसेच संबंधित MMVR कायद्यातील कलम 33, 35 आणि 145(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये मारुती सुझुकी टॅक्सी क्रमांक MH 01 CJ 6487, बजाज रिक्षा MH 02 DU 0777, बजाज रिक्षा MH 03 BY 4268, मारुती सुझुकी टॅक्सी MH 02 BQ 7392 आणि मारुती ऑल्टो कॅब MH 01 EM 6048 यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! ७५ कोटींकडे झेप
सोनिया गांधींचे आत्मचरित्र हार्परकॉलिन्स इंडिया करणार प्रकाशित
फुकेट-दिल्ली एअर इंडियाच्या पायलटची ड्रग्ज चाचणी ‘नॉन-नेगेटिव्ह’
महापुरानंतर भारताकडे कोणतीही भरपाई मागितलेली नाही
या प्रकरणातील आरोपींमध्ये जोएब अल्ताफ देशमुख (३२), अमीन रमजान पठाण (३१), रियाझ अब्दुलगनी शेख (४५), नजीर इब्राहिम पटेल (५७) आणि आनंद कुमार नानकप्रसाद राय (६०) यांचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलिस ठाण्याच्या गुंडाविरोधी पथकाने केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शिवाजी साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार हेमंत बाबुराव विचारे, पोलिस शिपाई सुनील चंद्रकांत राठोड, संतोष काशिनाथ भागवत आणि ऋषिकेश प्रविण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
