घरबिजनेसमायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्याचा भारतासह ७४ देशांना फटका

मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्याचा भारतासह ७४ देशांना फटका

अब्जावधी डॉलरच्या नुकसानीचा अंदाज

मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल सेवांमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका भारतातील विमान कंपन्या आणि व्यावसायिक क्षेत्राला बसला आहे. इंडिगो आणि अकासा एअरच्या ई-मेल ग्राहकसेवांमध्ये अडथळे निर्माण झाले असून इंडिगोने प्रवाशांना पर्यायी संपर्क माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. एअर इंडियाने मात्र ई-मेल सेवा पर्यायी मार्गाने वळवून ग्राहक संपर्क सुरू ठेवल्याचे स्पष्ट केले. १२ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या समस्येचा परिणाम १३ नोव्हेंबरलाही कायम होता. जागतिक स्तरावर या आउटेजमुळे अब्जावधी डॉलरच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी एकूण आर्थिक नुकसानीचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर झालेला नाही.

या बिघाडाचा परिणाम भारतासह जगातील ७४ देशांमध्ये जाणवला. आउटलुक, मायक्रोसॉफ्ट टीम्स, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, वनड्राइव्ह आणि कोपायलट यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले. डाउनडिटेक्टरच्या माहितीनुसार, अमेरिकेत आउटलुक सेवेसंदर्भातील तक्रारींचा आकडा एका टप्प्यावर १ लाख ३८ हजार ५८ पर्यंत पोहोचला होता. भारतातही १३ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत ८०० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. ई-मेल, ऑनलाइन बैठका आणि फाइल्सच्या देवाणघेवाणीवर परिणाम झाल्याने अनेक कंपन्यांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले.
हे ही वाचा:
डाळींच्या वाढत्या दरांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचा कठोर पवित्रा

झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदी आणखी पाच वर्षे कायम

आरबीआयकडून पुन्हा व्याजदर वाढवण्याचे संकेत

सोनियांच्या पुस्तकात खर्गेंच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येबाबत फसवी माहिती

ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेतील सरकारी यंत्रणांनाही या तांत्रिक समस्येचा फटका बसला. काही रुग्णालयांच्या प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण झाले. ऑस्ट्रेलियातील व्यवसायांनाच या आउटेजमुळे अब्जावधी डॉलरचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज आरएसएम ऑस्ट्रेलियाचे रिस्क अॅडव्हायजरी पार्टनर अश्विन पाल यांनी व्यक्त केला. अमेरिकेतील वर्कहॉर्स ग्रुप या कंपनीनेही तांत्रिक व्यत्ययामुळे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलली.

मायक्रोसॉफ्टच्या प्राथमिक माहितीनुसार, काही सर्व्हर अचानक अनुपलब्ध झाल्यामुळे उर्वरित पायाभूत सुविधांवरील ताण वाढला आणि सेवांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये अडथळे निर्माण झाले. कंपनीकडून सर्व्हर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, मायक्रोसॉफ्ट ३६५ चे जगभरात ४३ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. त्यामुळे या घटनेने जागतिक व्यवसायांचे एका तंत्रज्ञान कंपनीवरील वाढते अवलंबित्व आणि डिजिटल यंत्रणांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version