काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर (मंगळवार) रोजी प्रकाशित झाले. मात्र, प्रकाशनानंतर हे पुस्तक ऐतिहासिक घटनांच्या कथित चुकीच्या मांडणीमुळे आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या कुटुंबीयांवरील हिंसाचाराची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याच्या प्रयत्नांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या ‘जातीय दंगलीत’ झाल्याचा उल्लेख सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, खर्गे यांनी यापूर्वी स्वतःच आपल्या कुटुंबीयांची हत्या हैदराबादच्या निजामाच्या रझाकारांनी केल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.
सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात सुरुवातीला काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर त्यांनी लिहिले आहे की, “खर्गे अवघ्या सात वर्षांचे असताना जातीय दंगलीत त्यांचे घर आणि कुटुंबीय जाळण्यात आले. या घटनेत ते आणि त्यांचे वडील बचावले.” मात्र, या उल्लेखातून खर्गे यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूमागील परिस्थिती वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, ही बाब स्वतः खर्गे यांनी काही महिन्यांपूर्वीच सांगितलेल्या घटनाक्रमाशी विसंगत आहे. १३ जून रोजी काँग्रेसचे माजी नेते आणि खासदार कपिल सिब्बल यांच्याशी झालेल्या संवादात खर्गे यांनी आपल्या बालपणीच्या त्या भीषण आठवणींना उजाळा दिला होता.
हे ही वाचा:
शत्रूला अनपेक्षित धक्का देण्यासाठी सज्ज राहा!
खर्गे यांनी सांगितले होते की, रझाकारांची कार्यपद्धती अत्यंत क्रूर होती. २० ते २५ घोड्यांवरून हे लोक गावांमध्ये दाखल होत आणि नागरिकांना मारहाण करून त्यांची हत्या करत असत. त्यांच्या गावाच्या अगदी जवळ असलेल्या एका गावात मोठी हत्याकांडाची घटना घडली होती. तेथे किमान ७८० लोकांची हत्या करण्यात आली होती. हे गाव त्यांच्या गावापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर होते.
ते पुढे म्हणाले होते, “त्यानंतर रझाकार आमच्या गावाच्या दिशेनेही आले. रस्त्याच्या कडेला असलेली प्रत्येक घरे ते जाळत होते. आमचे घरही रस्त्याजवळ असल्याने त्यांनी त्यावर हल्ला केला. घराला आग लावण्यात आली, त्यात माझ्या आईचा मृत्यू झाला. माझा भाऊ, बहीण आणि काकांचाही मृत्यू झाला. त्यावेळी माझे वडील मपन्ना आमच्या सात ते आठ एकरांच्या शेतात काम करत होते. आजूबाजूला सुरू असलेल्या आरडाओरड्यामुळे ते अस्वस्थ झाले होते.”
खर्गे यांनी सांगितले की, त्यावेळी कोणीतरी त्यांच्या वडिलांना सांगितले, “अण्णा, तुमचे घर जळत आहे. घरातील कोणी वाचले आहे की नाही, हे आम्हाला माहीत नाही. मात्र, तुमचे मूल झाडाखाली इतर मुलांसोबत खेळत आहे. निदान त्याला तरी वाचवण्यासाठी जा.”
रझाकारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्याचे वर्णन स्वतः मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिब्बल यांच्याशी झालेल्या मुलाखतीत केलेले असतानाही सोनिया गांधी मात्र त्याचा उल्लेख जातीय करतात, त्यात रझाकारांचा उल्लेखही करत नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुस्लिम मतांसाठी सोनिया गांधी यांनी ही भूमिका घेतली का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
निजामाच्या राजवटीत रझाकारांचा हैदोस
मल्लिकार्जुन खर्गे यांचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी येथे एका दलित कुटुंबात झाला. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली होते. निजामाने भारतात विलीन होण्यास नकार दिला होता. त्याच्या रझाकारांनी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांकडून हैदराबादचे कथित स्वातंत्र्य कायम ठेवण्याच्या समर्थनार्थ लेखी निवेदने मागण्यास सुरुवात केली होती. लोकांनी विरोध करू नये, यासाठी ग्रामीण भागात लूटमार आणि दहशत निर्माण केली जात होती. त्यावेळी खर्गे अवघे सहा वर्षांचे होते आणि त्यांनी या अत्याचारांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता.
