जागतिक अर्थव्यवस्थेवर विविध संकटांचे सावट असतानाच भारतासाठी मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मूडीज रेटिंग्जने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा अंदाज ६ टक्क्यांवरून वाढवून ७ टक्के केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची देशांतर्गत ताकद आणि अपेक्षेपेक्षा चांगली आर्थिक कामगिरी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत भारताची वास्तविक जीडीपी वाढ ८.२ टक्के राहिली असून, एप्रिल ते जून या तिमाहीत अर्थव्यवस्थेने ७.८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग कायम राहण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि व्यापाराशी संबंधित आव्हाने असतानाही भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने मजबूत असल्याचे मूडीजच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या या वाढीमागे देशांतर्गत मागणी, खासगी उपभोग, सरकारी पायाभूत सुविधा खर्च आणि सेवा क्षेत्राची मजबूत कामगिरी हे प्रमुख घटक असल्याचे मूडीजने नमूद केले आहे. ग्राहकांचा खर्च वाढत असून, पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकारी गुंतवणुकीमुळे आर्थिक हालचालींना चालना मिळत आहे. त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीतही सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्पादन, सेवा आणि गुंतवणुकीशी संबंधित हालचालींमुळे अर्थव्यवस्थेचा विस्तार कायम राहण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे मूडीजचा ७ टक्क्यांचा अंदाज इतर काही प्रमुख संस्थांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ६.४ टक्के, एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने ६.६ टक्के, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने ६.६ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे भारताच्या विकास क्षमतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक संकेत मिळत आहेत.
हे ही वाचा:
सोने विकून पतीने बायकोला घेतला आयफोन १८ प्रो
दिल्लीमध्ये १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या
गणपती एकदंत का? अस्त्राचा मान की ज्ञानासाठी त्याग?
मात्र, पुढील काळात भारतासमोर काही महत्त्वाची आव्हानेही कायम राहणार आहेत. ऊर्जेच्या वाढत्या किमती, जागतिक बाजारातील अस्थिरता, महागाईचा दबाव आणि हवामानातील बदलांमुळे अन्नधान्याच्या किमती वाढण्याचा धोका याचा आर्थिक वाढीवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः एल निनोसारख्या हवामानविषयक परिस्थितीमुळे कृषी उत्पादन आणि अन्नमहागाईवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजबूत देशांतर्गत मागणी कायम ठेवण्याबरोबरच महागाई नियंत्रणात ठेवणेही महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरी सध्याच्या आर्थिक कामगिरीच्या आधारावर मूडीजने भारताच्या वाढीचा अंदाज वाढवला असून, आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारत ७ टक्क्यांच्या वेगाने वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.
