भारतीय उद्योगविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे. चीनमधील बायटडान्स कंपनीचे सहसंस्थापक झांग यिमिंग यांना मागे टाकत अंबानी यांनी श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात तब्बल ९ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ८५ हजार २६४ कोटी रुपयांची वाढ झाली. यामुळे त्यांची एकूण संपत्ती ८९ अब्ज डॉलरवर पोहोचली असून जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांनी २३ वे स्थान मिळवले आहे.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत झालेल्या या प्रचंड वाढीमागे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील ऐतिहासिक तेजी हे प्रमुख कारण ठरले आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी रिलायन्सचा शेअर तब्बल ११.६० टक्क्यांनी वधारून १ हजार ३०० रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा वर्षांतील एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगितले जात आहे. या तेजीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल वाढून १७.५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. परिणामी, कंपनीतील मोठ्या हिस्सेदारीमुळे अंबानी यांच्या वैयक्तिक संपत्तीतही मोठी भर पडली.
हे ही वाचा:
निर्मला सीतारमण यांच्या एका विधानाने शेअर बाजारात दिवाळी!
तुषार कपूर यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्ताचे निलंबन
छत्रपती संभाजीनगरमधून २,२७९ लिटर पतंजली तूप जप्त
रिलायन्सच्या या तेजीला कंपनीची मजबूत आर्थिक कामगिरी आणि विविध व्यवसायांमधील विस्ताराची जोड मिळाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीने आतापर्यंतचा विक्रमी महसूल, परिचालन नफा आणि निव्वळ नफा नोंदवला. तेल आणि पेट्रोकेमिकल्ससोबतच दूरसंचार, किरकोळ व्यापार आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या विस्ताराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यातच जिओ प्लॅटफॉर्म्सच्या दमदार कामगिरीमुळे रिलायन्स समूहाबाबत बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम कंपनीच्या शेअरच्या किमतीवर दिसून आला.
दरम्यान, आशियातील श्रीमंतांच्या क्रमवारीत झांग यिमिंग यांची संपत्ती सुमारे ८४ अब्ज डॉलर असून ते दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. मुकेश अंबानी यांनी पुन्हा मिळवलेले अव्वल स्थान भारतीय उद्योगविश्वासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, अब्जाधीशांची संपत्ती ही शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असते. त्यामुळे आगामी काळात या क्रमवारीत पुन्हा बदल होऊ शकतो. तरीही रिलायन्सच्या शेअर्समधील तेजीने अंबानी यांच्या संपत्तीला दिलेली ही मोठी झेप सध्या जागतिक आर्थिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
