भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशातील परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी सुरू केलेल्या विशेष फॉरेक्स स्वॅप योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ७२.८५ अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे ६.२ लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन भारतात आले आहे. विशेष म्हणजे, या एकूण आवकेपैकी मोठा हिस्सा अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) एफसीएनआर(बी) ठेवींमधून आला आहे. त्यामुळे डॉलरची आवक वाढण्याबरोबरच देशाचा परकीय चलन साठाही मजबूत होण्यास मदत झाली आहे.
देशातील बँकांकडे डॉलरची उपलब्धता वाढावी आणि रुपयावरील दबाव कमी व्हावा, या उद्देशाने आरबीआयने ही विशेष योजना सुरू केली. जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयावर दबाव असताना परकीय चलनाची आवक वाढवणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेत बँकांना परकीय चलन उभारण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात एफसीएनआर(बी) ठेवी, परकीय चलनातील कर्ज आणि बाह्य व्यावसायिक कर्जाचा समावेश आहे.
हे ही वाचा:
सुनील शुक्रे महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त
कांद्याच्या दरवाढीला लगाम घालण्यासाठी ‘कांदा एक्सप्रेस’ धावली
पुलवामामध्ये दहशतवाद्यांचे दोन साथीदार अटकेत
धोत्र्याच्या फळाची ऑनलाइन विक्री; ऍमेझॉनसह तीन कंपन्यांचे लायसन्स निलंबित
या योजनेत एफसीएनआर(बी) ठेवींनी सर्वाधिक योगदान दिले आहे. २१ ऑगस्टपर्यंत या माध्यमातून सुमारे ६५.४ अब्ज डॉलर भारतात आले आहेत. त्याशिवाय परकीय चलनातील कर्जातून सुमारे ४.८६ अब्ज डॉलर, तर बाह्य व्यावसायिक कर्जातून २.५९ अब्ज डॉलर भारतात आले आहेत. त्यामुळे एकूण परकीय चलनाची आवक ७२.८५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
आरबीआयच्या या उपक्रमामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठीही भारतातील बँकांमध्ये डॉलरच्या ठेवी ठेवण्याची संधी अधिक आकर्षक झाली. बँकांना परकीय चलन उभारणीचा खर्च आणि जोखीम व्यवस्थापन काही प्रमाणात कमी करता आल्याने त्यांनी अनिवासी भारतीयांच्या ठेवींवर तुलनेने चांगले व्याजदर देण्यास सुरुवात केली. परिणामी एफसीएनआर(बी) ठेवींमध्ये मोठी वाढ झाली.
आरबीआयच्या या योजनेचे महत्त्व यासाठीही वाढते की, २०१३ मध्ये आरबीआयने अशाच प्रकारची एफसीएनआर(बी) योजना आणली होती. त्यावेळी सुमारे २६ अब्ज डॉलर भारतात आले होते. यावेळी केवळ एफसीएनआर(बी) ठेवींमधून आलेली रक्कम त्यापेक्षा अडीचपट अधिक आहे. यावरून सध्याच्या योजनेला मिळालेला प्रतिसाद किती मोठा आहे, हे स्पष्ट होते.
परकीय चलनाच्या या मोठ्या आवकेचा थेट फायदा भारताच्या परकीय चलन साठ्याला होत आहे. १४ ऑगस्टपर्यंत देशाचा परकीय चलन साठा ७१६.९ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. मजबूत परकीय चलन साठा हा देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. आयात खर्च भागवणे, जागतिक बाजारातील अस्थिरतेचा सामना करणे आणि रुपयावरील दबाव कमी ठेवणे यासाठी मोठा परकीय चलन साठा उपयोगी ठरतो.
एफसीएनआर(बी) ठेवींसाठी ही विशेष सुविधा ३१ ऑगस्ट २०२६पर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात या माध्यमातून आणखी किती डॉलर भारतात येतात, याकडे बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सध्या मात्र आरबीआयच्या या योजनेमुळे भारतात मोठ्या प्रमाणात डॉलरची आवक झाली असून, देशाचा परकीय चलन साठा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
