भारतीय चलन व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) पॉलिमर अर्थात प्लास्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या नोटांच्या प्रायोगिक वापराची तयारी करत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात १० आणि २० रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याचे नियोजन असून, १ एप्रिल २०२७ पासून या नोटांच्या प्रायोगिक वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नव्या नोटांचे आकारमान सध्याच्या कागदी नोटांप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे. आकारमान बदलल्यास देशभरातील एटीएम यंत्रणांमध्ये तांत्रिक बदल करावे लागतील. त्यामुळे बँकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नोटांच्या आकारमानात बदल झाल्यास एटीएममधील कॅसेट, सेन्सर आणि रोख वितरण यंत्रणेत बदल करणे आवश्यक ठरते. यापूर्वी १०० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणताना देशातील सुमारे दोन लाख ४० हजार एटीएममध्ये बदल करण्यासाठी अंदाजे १०० कोटी रुपये खर्च झाले होते. त्यामुळे यावेळी विद्यमान आकारमान कायम ठेवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, आरबीआय नोट मुद्रण कंपनीने पॉलिमर नोटांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी सहा कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.
हे ही वाचा:
ब्रेकअप केला म्हणून बलात्काराचा गुन्हा ठरणार नाही!
सोमनाथ मंदिर परिसरातील मांसाहार विक्रीवरील बंदी रद्द
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सिडको टँकर्सवर जीपीएस लावणार
या नोटांच्या निर्मितीसाठी बायअॅक्सिअली ओरिएंटेड पॉलीप्रॉपिलीन (बीओपीपी) साहित्याचा वापर केला जाणार आहे. १० आणि २० रुपयांच्या नोटांसाठी प्रत्येकी ३४ हजार रिम्स साहित्य खरेदी करण्याचे नियोजन आहे. पॉलिमर नोटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पारंपरिक कागदी नोटांपेक्षा दोन ते चार पट अधिक टिकाऊ असतात. त्यामुळे नोटांची वारंवार छपाई आणि खराब झालेल्या नोटा बदलण्याचा खर्च कमी होऊ शकतो.
केंद्र सरकारने १० आणि २० रुपयांच्या प्रत्येकी एक अब्ज पॉलिमर नोटांच्या प्रायोगिक चाचण्यांना मंजुरी दिली आहे. भारतीय हवामान आणि दैनंदिन वापरातील परिस्थितीत या नोटांची टिकाऊ क्षमता तपासली जाणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे, पॉलिमर नोटा आल्यामुळे सध्याच्या कागदी नोटा बंद होणार नाहीत. त्या समांतरपणे चलनात राहतील. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडासह अनेक देशांमध्ये अशा नोटांचा वापर सुरू आहे.
