केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार भक्कमपणे उभे आहे आणि त्याला हलवणे कुणालाही शक्य नाही असे विधान केले. ते म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्ता कायम राखेल. राज्यातील भाजपची पकड अभेद्य असून रामायणातील अंगदाच्या तसूभरही न हलणाऱ्या पायासारखी भक्कम आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेशात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करणार असल्याचे अमित शहा म्हणाले.
लखनऊ येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “उत्तर प्रदेशातील भाजपचे सरकार म्हणजे अंगदाचा पाय आहे. तो कोणीही हलवू शकत नाही. भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. याबाबत कोणतीही शंका असण्याचे कारण नाही.” यावेळी अमित शाह यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही जोरदार टीका केली. पुढील तीन दशके समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात सत्ता मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, “(समाजवादी पक्षाचे अध्यक्ष) अखिलेश बाबू, माझे शब्द लक्षात ठेवा. पुढील ३० वर्षे तुमचा पक्ष उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करू शकणार नाही. जनताच तुमच्या तिसऱ्या पिढीलाही माफ करणार नाही.”
हे ही वाचा:
अंधेरीतून ६६ लाखांचा ‘हायड्रो गांजा’ जप्त
विमल पान मसाला जाहिरात प्रकरणात अजय देवगणची हायकोर्टात धाव
अर्शदीपचा विकेट्सचा दीडशतकी धमाका!
आपल्या भाषणात समान नागरी संहितेचा मुद्दा महत्त्वाचा ठरवत अमित शाह यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा जनादेश मिळाल्यास हा कायदा लागू करण्याच्या दिशेने पक्ष पुढे जाईल. ते म्हणाले, “यावेळी सरकार स्थापन झाल्यानंतर उत्तर प्रदेशात समान नागरी संहिता लागू केली जाईल. अनेक राज्यांमध्ये यापूर्वीच समान नागरी संहिता लागू करण्यात आली आहे.”
अयोध्येतील राम मंदिर आंदोलनाचा संदर्भ देत अमित शाह यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला. ३० ऑक्टोबर १९९० रोजी अयोध्येत कारसेवकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख त्यांनी केला. रामभक्तांवर गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा सत्तेत येण्याबाबत कोणत्या आधारावर दावे केले जात आहेत, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान अमित शाह यांनी दिले.
मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांवरही अमित शाह यांनी भाष्य केले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खेळातील पराभूत संघ पंचांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतो, अशी तुलना त्यांनी केली. ते म्हणाले, “सामना हरल्यानंतर आता ते पंचांवर दोषारोप करत आहेत आणि मतचोरीचे आरोप करत आहेत.” विरोधकांच्या आरोपांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची भाजपची तयारी असल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. विरोधकांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
