घरसंपादकीयआली रे आली हिशेबाची वेळ आली!

आली रे आली हिशेबाची वेळ आली!

कॉक्रोच जनता पार्टी ही सध्या गपगार आहे. स्वाभाविकच गेल्या काही दिवसांतील आंदोलनानंतर शांततेचा बॉण्ड भरून दिल्यामुळे त्यांना आता लोकांना त्रासदायक ठरेल असे आंदोलन करता येणार नाही. त्यातच कॉक्रोच पार्टीचा नेता अभिजित दिपकेनेही दिवाळीनंतरच आता आंदोलन वगैरे करू असे आवाहन केले आहे. लोकांनी आनंदात दिवाळी साजरी करावी एवढी मेहेरबानी कॉक्रोच पार्टीला करावीशी वाटली आहे. त्याचे कारण कायद्याचा दंडुका हेच आहे. पण हे सगळे झाल्यानंतर त्यांच्यापुढील आव्हाने थांबणार नाहीत, याची त्यांना कल्पना नसावी.

शेवटी तुम्ही जी जी वक्तव्ये केलीत, ज्या कृती केल्यात त्या प्रत्येकाचे उत्तर आज ना उद्या द्यावे लागते. त्या वक्तव्यांचा तेव्हा तुम्हाला अर्थ कळत नसतो किंवा मग जाणीवपूर्वक तशी वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण नंतर आपलीच ही वक्तव्ये आपल्या अंगलट येतात हे स्पष्ट होते.

कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दास याच्याबाबतीत आता हिशेब देण्याची वेळ आली आहे. सौरव दास हे जरी त्याचे नाव दैनंदिन व्यवहारात घेतले जात असले तरी त्याचे खरे नाव काय, त्याचे नागरकित्व कोणते, त्याची पार्श्वभूमी काय, हे विचारण्याचा तर प्रत्येकाला अधिकार आहे. त्यानुसार सौरव दासविरोधात न्यायालयात आता एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सौरव दासचे राष्ट्रीयत्व कोणते, त्याचे आईवडील कोण याची माहिती विचारण्यात यावी, त्याने न्यायालयाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यांबाबत दखल घेण्यात यावी, त्यासंदर्भात कठोर पावले उचलण्यात यावीत अशी ही याचिका आहे. त्यानुसार या याचिकेशी संबंधित लोकांना मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्याप्रमाणे आता प्रत्येकाला आपली भूमिका, बाजू मांडावी लागेल. दास जर भारताचा नागरीक नसेल तर त्याचा पासपोर्ट, आधार कार्ड रद्द करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘सार्वजनिक महाभियोगा’वर पावसाचे पाणी

पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री बोरीवली-भाईंदरदरम्यान जम्बो ब्लॉक

मालाडच्या इनऑर्बिट मॉलमध्ये नमाजसाठी स्वतंत्र जागा

नेतान्याहूंच्या आघाडीला बहुमतापासून ८ जागा कमी

सदर याचिकाकर्त्याने सौरव दासचे नाव योगेश शर्मा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सौरव दासचे खरे नाव काय, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय, त्याचे आईवडील नेमके कोण, तो कुठला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता समोर येणार आहेत. सौरव दासच्या बाबतीत याआधीपासूनच संशयाचे धुके निर्माण झाले आहे. एरवी ही सगळी कॉक्रोच मंडळी प्रत्येकाची पात्रता काय, योग्यता काय असे प्रश्न विचारत असताना स्वतःबद्दल मात्र सगळीच माहिती संदिग्ध स्वरूपात ठेवतात. त्याबद्दल स्पष्ट बोलत नाहीत. अभिजित दिपकेने तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबद्दल कुस्तितपणे प्रश्न विचारला होता. मात्र त्याने बोस्टनला मिळविलेल्या पदवीबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही. मात्र ही मंडळी आयएएस ज्ञानेश कुमारांना एकेरीत विचारतात, मोदी-शहा या लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नेत्यांना कस्पटासमान लेखतात, न्यायालयांना जाब विचारतात, न्यायाधीशांची औकात काढतात. त्यामुळे आता यांचीही सगळी माहिती समोर यायला हवी अशी जर कुणाची मागणी असेल तर ते व्हायला हवे.

गणेश कुमार नावाच्या व्यक्तीने सौरव दासविरोधातील ही याचिका केली आहे. त्यामागे सौरव दासच्या एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी जो संशय आहे, ते कारण आहे. सौरव दास असे जरी त्याचे नाव असले तरी त्याचे वडील हे नेपाळी होते आणि त्याची आई सीमा छेत्री असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र याबाबत पुराव्यासह कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याच्या वडिलांनी आईला सोडल्यानंतर त्याच्या आईने सुबीर दास नावाच्या इसमाशी विवाह केला. सौरव दास सध्या त्यांचे नाव लावतो. सुबीर दास यांनी सौरव दासला आपला मुलगा मानले आहे का, कायदेशीर मार्गाने त्याला दत्तक घेतले आहे का, हे कळलेले नाही. पण त्याचे खरे आईवडील हे नेपाळी असतील तर तो भारतीय कसा झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावरूनच ही याचिका केली गेली आहे.

मागे जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान सौरव दास राहात असलेल्या त्याच्या घराजवळ कुणीतरी युट्युबरने व्हीडिओ चित्रण केले होते. त्यावरून सौरव दासला राग आला होता. आपल्या घराची, आपली माहिती अशी कशी काय दिली जाते असा प्रश्न त्याने विचारला होता. पण याविषयी सत्य माहिती देण्याची तयारी मात्र त्याने कधी दाखविली नाही. न्यायालयावर शिंतोडे उडवणे हा कॉक्रोच जनता पार्टीचा कार्यक्रम राहिलेला आहे. जंतर मंतरवर पहिले आंदोलन झाले, त्यानंतर त्यांना हुरूप आला. त्यावरून त्यांनी सगळ्यांचा उद्धार करायला सुरुवात केली. आता मीडिया आपल्यासोबत आहे, तेव्हा मिळेल त्याला जाब विचार, त्याचा उद्धार कर, त्याची हेटाळणी कर असे प्रयत्न कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी सुरू केले होते. पण १० ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनाआधीच त्यांना उचलण्यात आल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या फुग्यात भरलेली हवा हळूहळू निघू लागली.

सौरव दासने तेव्हा एसआयआरसंदर्भात चक्क सरन्यायाधीशांनाच कठड्यात उभे केले. त्याबद्दलही आता याचिकेत मुद्दा उपस्थित केला आहे. सौरव दासने न्यायव्यवस्थेबद्दल केलेल्या टिप्पणीसंदर्भातही न्यायालयाने जाब विचारावा अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. त्याने म्हटले होते की, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये बेकायदेशीर एसआयआर प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल याची खात्री करून देणारे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी आता या प्रकरणापासून शांतपणे स्वतःला दूर ठेवावे.

त्यांनी काही करण्याचा निर्णय घेतला तरी त्यांनी ते करत राहावे. त्याची कोणालाही पर्वा नाही. देशातील तरुण पिढीचे मतदानाचे अधिकार हिरावून घेण्याच्या आणि राज्यांच्या निवडणुकांवरही परिणाम होण्याच्या प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालय सहभागी आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रकरण, राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्याचे प्रकरण आणि दिल्लीतील घटनात्मक पेचप्रसंग यांसारख्या महत्त्वाच्या याचिकांवर वेळेत सुनावणी घेऊन निर्णय न दिल्यामुळे भाजपला अखेर राजकीय फायदा झाला. आपल्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासावर हा एक मोठा डाग आहे. याचा हिशेब भारतातील जनता आणि तरुण पिढी ठरवेल. न्यायालयाला उद्या किंवा जेव्हा योग्य वाटेल तेव्हा जे काही करायचे आहे ते करू द्या.

सौरव दासचे हे विधान न्यायालयावर चिखलफेक करणारे होतेच पण न्यायालयाबाबत सर्वसामान्यांच्या मनात एक अविश्वास आणि अनादराची भावना निर्माण करणारेही होते. कॉक्रोच जनता पार्टीचा खरा उद्देश या सगळ्या व्यवस्थांबद्दल अविश्वास निर्माण करणे हाच होता. तो पहिल्या आंदोलनानंतर लगेचच दिसून आला. कारण त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न बाजुला ठेवत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या विषयाला हात घातला. त्यावरून न्यायालयानेही त्यांना जाब विचारला होता की, तुम्ही रोज वेगवेगळ्या विषयांवर कशा काय मागण्या करता?

नुकतीच निखिल वागळे, उबाठाचे खासदार संजय राऊत यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यांनी न्यायसंस्थेवर केलेल्या आरोपांबद्दल विचारणा केली होती. त्यावरून त्यांनी माफी मागितली. तरीही १७ नोव्हेंबरला त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

सगळीकडे आमचीच चर्चा आहे, सगळे राजकीय पक्ष आपल्या पावलावर पाऊल टाकून चालत आहेत, त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, त्यामुळे कायदा, न्यायव्यवस्था, संसद, त्यात निवडून आलेले प्रतिनिधी हे आपल्या तालावर नाचतील, आपण मागू ती व्यक्ती राजीनामा देईल, आपण म्हणू तेव्हा करोडो लोक रस्त्यावर उतरतील आणि हवा त्याचा राजीनामा घेण्याची मुभा आपल्याला मिळेल. पोलिस वगैरे म्हणजे किस झाड की पत्ती अशा अविर्भावात ही सगळी कॉक्रोच मंडळी गेले काही महिने थैमान घालत होते किंबहुना, त्यांना ते घालू दिले असावे. जेणेकरून ते चुका करतील, आपल्याच सापळ्यात अडकतील. तसेच झाले. जंतर मंतर हे ठिकाण आंदोलनासाठी बंद करण्यात आलेले असतानाही कॉक्रोच जनता पार्टीला वाटले की, आपण तो कायदा, तो नियम मोडून टाकला तरी कायदा आपले काय वाकडे करणार, आपल्याला अटक झाली तर जनता रस्त्यावर उतरून आपल्याला पोलिसांच्या, न्यायालयाच्या तावडीतून सोडवेल आणि आपण एका रात्रीत देशाचे हिरो बनू. पण वास्तवात असे काहीही झाले नाही.

१० ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्यावर त्यासाठी कुणीही रस्त्यावर आले नाही. जंतर मंतरवर नियम मोडून तिरंगा घेऊन आत प्रवेश करणाऱ्या आशुतोष रांका, सौरव दाससोबत इनमिन पाच सहा जण होते. पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली तेव्हापासून त्यांना कायद्याचा खरा बडगा काय असतो, आपली देशात नेमकी काय औकात आहे, याची पुरती जाणीव त्यांना झाली. त्यामुळेच आता शांततेचा बॉण्ड भरून दिल्याने सगळे गप्प आहेत. मात्र त्यामुळे त्यांनी केलेली वक्तव्ये, दाखविलेला रुबाब याला प्रत्युत्तर मिळणार नाही, असे नाही. त्यामुळेच आता ही कायदेशीर प्रक्रिय़ा सुरू झाली आहे.

१० ऑक्टोबरला दिल्लीत जे आंदोलन होणार होते, त्यासाठी ध्रूव राठी वगैरे आला होता. अभिनेता प्रकाश राजही होता. त्यांनी मिळून एक व्हीडिओ केला होता. जणू आता आपण केंद्र सरकारला धोबीपछाड देणार अशी भाषा त्यात वापरली जात होती. प्रकाश राजने सिंघम चित्रपटातील संवाद वापरत आली रे आली आता तुझी वेळ आली, असा डायलॉगही मोठ्या टेचात मारला होता. पण प्रत्यक्षात त्याच दिवसापासून सगळा नूरच पालटला. आता सौरव दासच्या बाबतीत हाच डायलॉग खरा ठरला आहे. आली रे आली आता हिशेबाची वेळ आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version