शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उद्योगपती विजय मल्ल्या याच्याबाबत केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी आपल्या आगामी ‘बोध कीर्तन’ या पुस्तकात मल्ल्याची पाठराखण केली असून, त्याला ‘फ्रॉड’ किंवा ‘भगोडा’ म्हणणे मान्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच, मोदी सरकारनेच मल्ल्याला देश सोडण्यास भाग पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
‘मल्ल्याची गोष्ट’ या पुस्तकातील प्रकरणात संजय राऊत यांनी मल्ल्यासोबतचे संसदेतील अनुभव मांडले आहेत. मल्ल्या दिलदार, मोकळ्या मनाचा आणि कोणाला फसवून व्यापार करण्याची मानसिकता नसलेला माणूस होता, असे त्यांनी म्हटले आहे. मल्ल्याने एका उद्योगासाठी बँकांकडून कर्ज घेतले; मात्र तो उद्योग अडचणीत आल्याने कर्जाचे हप्ते थकले. अशा वेळी बँकांनी त्याला सहकार्य करायला हवे होते. त्याला कर्जमाफी नको होती, तर केवळ काही सवलत हवी होती, असा दावा संजय राऊत यांनी पुस्तकात केला आहे.
संजय राऊत यांनी मल्ल्याच्या देश सोडण्याच्या परिस्थितीचा विचार करण्याची गरज व्यक्त केली. अनेक उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली, मग मल्ल्याला थोडी सवलत का दिली नाही? तो सरकारचा मित्र नसल्याने त्याच्यावर कारवाई झाली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मल्ल्याने देशाच्या तिजोरीत कररूपाने योगदान दिले होते आणि त्याला ‘भगोडा’ म्हणणे योग्य नसल्याचेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
‘सार्वजनिक महाभियोगा’वर पावसाचे पाणी
राहुल गांधींच्या अराजकतेच्या राजकारणाविरोधात भाजपचा देशभरात एल्गार
प्रकृतीवर प्रश्न विचारताच ट्रम्प पत्रकारावर संतापले
पुस्तकात राऊत यांनी मल्ल्याच्या धार्मिक वृत्तीचाही उल्लेख केला आहे. मुंबई विमानतळावर भेट झाली असताना मल्ल्याने महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद आणि फूल दिल्याचा प्रसंग त्यांनी सांगितला आहे. तसेच, निवडणुकीच्या काळात पक्षाला आर्थिक मदत करण्याबाबत विचारले असता, बँक खाती गोठवल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देणेही शक्य नसल्याचे मल्ल्याने सांगितल्याचा अनुभव राऊत यांनी लिहिला आहे. दरम्यान, ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशन ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
