पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने पेट्रोल पंपांवरील दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच एमडीआरची नवी रचना लागू केली आहे. त्यानुसार दोन हजार रुपयांपर्यंतच्या इंधन व्यवहारांवर एमडीआर आकारला जाणार नाही. मात्र, दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारासाठी पेट्रोल पंप चालकांना प्रति व्यवहार पाच रुपये एमडीआर द्यावा लागणार आहे. व्यवहाराची रक्कम दोन हजार पाचशे रुपये असो किंवा पाच हजार अथवा दहा हजार रुपये, निश्चित शुल्क पाच रुपयेच राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या शुल्काचा थेट भार ग्राहकांवर टाकला जाणार नाही. त्यामुळे यूपीआयद्वारे इंधनाचे पैसे देताना ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
मात्र, एनपीसीआयच्या या निर्णयाला पेट्रोल पंप चालकांकडून विरोध करण्यात येत आहे. मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशनने भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पेट्रोल पंपांना एमडीआरमधून पूर्णपणे वगळण्याची मागणी केली आहे. पेट्रोल पंप चालकांच्या मते, इंधन विक्रीवरील नफा तुलनेने कमी असल्याने प्रत्येक मोठ्या यूपीआय व्यवहारामागे पाच रुपयांचा अतिरिक्त खर्च त्यांच्या व्यवसायावर परिणाम करू शकतो. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागणी मान्य न झाल्यास पंधरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून मुंबईतील पेट्रोल पंपांवर यूपीआय पेमेंट स्वीकारणे बंद करण्याचा इशारा मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटची सवय लागलेल्या ग्राहकांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
हे ही वाचा:
काळाचौकीला गणेशोत्सव मंडपाजवळ विजेच्या धक्क्याने बालिकेसह दोघांचा मृत्यू
दिल्ली-वाराणसीदरम्यान धावणार स्लीपर वंदे भारत
कोस्टल रोडवरून खाली कोसळली भरधाव बीएमडब्ल्यू; तिघे मृत्युमुखी
द्वादशम तू गजानन, १२ नावांची कथा!
दरम्यान, दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सामान्य व्यापारी यूपीआय व्यवहारांसाठी टक्केवारीच्या आधारावर एमडीआर लागू करण्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी पेट्रोल, रेल्वे, दूरसंचार, विमा यांसारख्या काही क्षेत्रांसाठी निश्चित शुल्काची रचना ठेवण्यात आली आहे. पेट्रोल पंपांसाठी प्रति व्यवहार पाच रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नसले, तरी पेट्रोल पंप चालक आणि एनपीसीआय यांच्यातील हा वाद पुढे काय वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारकडून पेट्रोल पंप चालकांच्या मागणीवर तोडगा काढला जातो का आणि पंधरा ऑक्टोबरपासून मुंबईतील पंपांवर यूपीआयची सुविधा सुरू राहते का, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.
