भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पदकतालिकेचे खाते उघडले रौप्यपदकाने. रविवार, २० सप्टेंबर रोजी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत सोनम उत्तम मस्कर, इलावेनिल वलारिवन आणि विदर्सा विनोद यांच्या संघाने रौप्यपदक पटकावले.
भारताने अंतिम क्रमवारीत १८९८.० गुणांसह दुसरे स्थान मिळवले. चीनने दमदार कामगिरी करत १९०४.२ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. चीनने पात्रता फेरीत स्वतःचाच पूर्वीचा १९०२.० गुणांचा विश्वविक्रम मोडला. हा विक्रम गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शिमकेंट येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत नोंदवला होता आणि तोच आशियाई विक्रमही होता.
भारत आणि यजमान जपान यांच्यात रौप्यपदकासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. अखेर भारताने दबावाच्या परिस्थितीत संयम राखत १८९८.० गुणांसह रौप्यपदक मिळवले. जपानने १८९७.१ गुणांसह कांस्यपदक पटकावले. भारत आणि जपानमध्ये केवळ ०.९ गुणांचा फरक राहिला.
सोनम आणि इलावेनिलची दमदार कामगिरी
सांघिक पदकासाठी तीनही खेळाडूंच्या पात्रता फेरीतील गुणांची बेरीज करण्यात आली. पात्रता फेरीत सोनम उत्तम मस्करने ६३४.१ गुणांसह तिसरे स्थान मिळवत भारताचे नेतृत्व केले. तिच्यानंतर ऑलिम्पियन आणि आपल्या तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या इलावेनिल वलारिवनने ६३३.५ गुणांसह सातवे स्थान मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदार्पण करणाऱ्या विदर्सा विनोदने ६३०.४ गुण मिळवत १२वे स्थान मिळवले.
हे ही वाचा:
दिल्ली-वाराणसीदरम्यान धावणार स्लीपर वंदे भारत
द्वादशम तू गजानन, १२ नावांची कथा!
लोखंडी गेट अंगावर कोसळून प्लंबरचा मृत्यू
नुकसानीचा दावा करण्याइतपतही अब्रू शिल्लक नाही काय?
स्पर्धेनंतर पीटीआयशी बोलताना विदर्साने सांगितले की, वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही, याची खंत असली तरी सांघिक रौप्यपदकामुळे भारताची सुरुवात चांगली झाली आहे. केरळमधील २७ वर्षीय विदर्साने मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आत्मविश्वासाने कामगिरी केली. आपण अजिबात दबावाखाली नव्हतो, तर आत्मविश्वासाने केवळ आपल्या शूटिंगवर लक्ष केंद्रित केले, असे तिने सांगितले.
विशेष म्हणजे विदर्साने १० मीटर एअर रायफल प्रकार केवळ दोन महिन्यांपूर्वी स्वीकारला होता. तिचा मुख्य प्रकार ५० मीटर रायफल ३-पोझिशन्स हा आहे. तरीही तिने एअर रायफलमध्ये वेगाने जुळवून घेत भारताला जपानपेक्षा पुढे ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विदर्साने आपल्या मुख्य ५० मीटर ३-पोझिशन्स प्रकारात यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला.
वैयक्तिक अंतिम फेरीतही प्रवेश
सांघिक रौप्यपदकानंतर भारताला आणखी एक संधी मिळणार आहे. सोनमने पात्रता फेरीत तिसरे, तर इलावेनिलने सातवे स्थान मिळवल्यामुळे दोघींनी महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या वैयक्तिक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे रविवारी भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, चीनने या प्रकारातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले. कनिष्ठ विश्वविजेती वांग झिफेईने ६३८.८ गुणांसह पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवले आणि नवीन आशियाई पात्रता विक्रम नोंदवला. चीनच्या हान जियानने ६३३.८ गुणांसह पाचवे स्थान मिळवत वैयक्तिक अंतिम फेरीत प्रवेश केला.
